Priyadarshini Indalkar Fitness Tips : अलीकडच्या काळात सगळ्याच अभिनेत्री आपल्या आरोग्याकडे आणि विशेषत: फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील करीना कपूर, मलायका अरोरा या अभिनेत्रींपासून ते मराठी इंडस्ट्रीमधील प्रिया बापट, सई ताम्हणकरपर्यंत सगळ्याच अभिनेत्री आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सुद्धा चाहत्यांना आरोग्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
प्रियदर्शिनीने नुकतीच सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने स्वत:चा फिटनेस कसा जपला याबाबत खुलासा केला. तसेच चाहत्यांना काही हेल्थ टिप्स सुद्धा दिल्या. अभिनेत्रीने तिच्या आहारातून शुगर पूर्णपणे कट केलेली आहे. म्हणजेच प्रियदर्शिनी साखरेचे पदार्थ खात नाही यासह दुधाचे पदार्थ खाणंही ती टाळते. साखर कमी केल्याने शरीरात मोठा फरक जाणवतो असं तिने नमूद केलं आहे.
सकाळी उठून लगेच चहा पिऊ नका; यामुळे अॅसिटिडीचा प्रचंड त्रास होतो. एका जागी बसून काम असल्यास दिवसभरात एकदा तरी चालायला जा, अर्धा ते पाऊण तास व्यायाम करा, सोशल मीडियावर दिसणाऱ्या आभासी फिटनेस गोल्सचा पाठलाग करू नका, स्वत:च्या शरीराचं मूल्यमापन करा या पाच हेल्थ टिप्स प्रियदर्शिनीने चाहत्यांना दिल्या आहेत.
प्रियदर्शिनी अनेकदा दिवसातून १०० ते १०७ सूर्यनमस्कार घालते. मात्र, जेव्हा शरीर पूर्ण तयार असतं, पुरेशी झोप झालेली असते फक्त तेव्हाच ती एवढे सूर्यनमस्कार घालते. या फिटनेस जर्नीमध्ये दीक्षित डाएटमुळे फायदा झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. एका सिनेमासाठी अभिनेत्रीला वजन कमी करावं लागणार होतं. यावेळी प्रियदर्शिनी १८ तास फास्टिंग करायची. याचे कालांतराने साइड इफेक्ट्स जाणवले म्हणून अभिनेत्रीने १४ ते १६ तास फास्टिंग करायचं असं नियोजन केलं.
दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती ‘दशावतार’ सिनेमात झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय अभिनेत्री हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. प्रियदर्शिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.
