Marathi Actor Prithvik Pratap : जगभरात ‘मातृदिन’ म्हणजेच मदर्स डे ११ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या खास दिवशी आपल्या आईसाठी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वातील कलाकारांनी सुंदर अशा पोस्ट, तर काहींनी आईसाठी पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली.
दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने देखील त्याच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पृथ्वीक आपल्या आईला घेऊन सलोनमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे.
‘मदर्स डे’ निमित्त पृथ्वीकने आपल्या आईबरोबरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याच्या आईने लेकाच्या सांगण्यावरून नवीन हेअरकट केल्याचं पाहायला मिळत आहे. नवी लूक, हेअरकट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटतं. या व्हिडीओमध्ये पुढे, पृथ्वीक आपल्या आईबरोबर घराची सजावट करत असल्याचं पाहायला मिळतं. तर, या व्हिडीओमध्ये शेवटी अभिनेत्याने कुटुंबीयांबरोबरचे फोटो एकत्रित जोडले आहेत.
याशिवाय, पृथ्वीकने या व्हिडीओला “इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का…” हे गाणं लावलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ प्रत्येकाच्या पसंतीस उतरला आहे. पृथ्वीक अन् त्याच्या आईमधलं हे सुंदर बॉण्डिंग पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. अभिनेत्याने या व्हिडीओला “हॅपी मदर्स डे मम्मा… आय लव्ह यू” असं कॅप्शन दिलं आहे. प्रत्येक मुलाने आपल्या आईसाठी अशाचप्रकारे काहीतरी खास करावं अशा भावना नेटकऱ्यांनी पृथ्वीकचा व्हिडीओ पाहून व्यक्त केल्या आहेत.
शिवाली परब, योगिता चव्हाण, श्वेता रंजन, चेतना भट या सगळ्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत पृथ्वीक अन् त्याच्या आईचं कौतुक केलं आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्याच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, पृथ्वीक प्रतापच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय नुकताच तो ‘हार्दिक शुभेच्छा’ या सिनेमात देखील झळकला होता.