‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी प्रेक्षकांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या हास्यजत्रेची संपूर्ण टीम अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. अमेरिकेत लाइव्ह शो करून ही टीम परदेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परदेशात हास्यजत्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून अभिनेत्री वनिता खरातही भारावून गेली आहे. तिने रसिक प्रेक्षकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चे आगळेवेगळे कथानक कसे सुचले, कोण आहे चित्रपटाची लेखिका? जाणून घ्या…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने टीमच्या अमेरिका दौऱ्याची झलक एका व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये कॅनडातील टोरंटो नाट्यगृह संपूर्ण भरलेले दिसत आहे. व्हिडीओद्वारे अभिनेत्रीने सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि रंगदेवतेचे आभार मानले आहेत. तसेच या व्हिडीओला वनिताने ‘नटरंग उभा’ हे गाणे जोडले आहे.

हेही वाचा : भूमी पेडणेकरने गोव्यात सुरु केलं आलिशान KAIA रेस्टॉरंट, नावात दडलाय खास अर्थ

वनिता खरात या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “टोरंटो तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा थिएटरमध्ये परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना.” कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सोनी मराठी वाहिनीचेही आभार मानले आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून वनिता व्हिडीओमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : “मी कोणत्याही कंपूचा…” अभिनेते मुकेश ऋषी यांनी सांगितलं बॉलिवूडमधील लोकांशी मैत्री न होण्यामागील कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनिताच्या व्हिडीओवर हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियदर्शनी इंदलकरने “असा प्रयोग पुन्हा होणार नाही!” अशी तर, पृथ्वीक प्रतापने “अविस्मरणीय प्रयोग” अशी कमेंट केली आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, “महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा मला अभिमान आहे.” असे कमेंटमध्ये लिहिले आहे. दरम्यान, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे हे सगळे कलाकार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.