Chetana Bhat Shares Her Acting Struggle : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे ‘कधी गोड, कधी तिखट’ अशी एक वेगळी ओळख निर्माण झालेली विनोदी अभिनेत्री म्हणजे चेतना भट. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून चेतनाचे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या कार्यक्रमातील तिचे अनेक स्किट्स हे तुफान व्हायरल होत असतात. चेतना आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांची आवडती झाली आहे.
गौरव मोरे व समीर चौघुले यांच्याबरोबरचे विनोदी स्किट्स असो… नम्रता संभेराव व वनिता खरात यांच्याबरोबरचे सासू सुनेचे स्किट्स असो… किंवा लोचन मजनू असो… आपल्या अनेक विनोदी स्किट्सनं चेतनानं प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पडलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयातील प्रवासाविषयी सांगताना चेतन भट भावुक झाली.
MHJ Unplugged या कार्यक्रमात चेतना म्हणाली, “मी ‘लोच्या झाला रे’ नाटकावेळी काम करत होती. तेव्हा प्रयोगांमुळे मला ऑफिसला जायला उशीर होत असे. त्यामुळे ऑफिसवर ओरडा मिळायचा. कधी कधी हाफ-डे टाकून प्रयोगाला जावं लागत असे. त्यामुळे तेव्हा तो जॉब सोडून मी नाटकाच्या प्रयोगच केले. त्यानंतर बदलापुरला डान्स शिकवण्याचा दूसरा जॉब केला. त्याचदरम्यान, मला एका शोसाठी कोरिओग्राफरच्या जॉबबद्दल विचारण्यात आलं. हा प्रवास सुरू असतानाच मला अभिनयातही गोडी निर्माण झाली होती. मी ज्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना डान्स शिकवायची त्यांना पाहून मला पण असं वाटायचं की, आपणही कधीतरी अभिनय केला पाहिजे.”
यापुढे चेतना सांगते, “त्यानंतर एक सिनेमा आला, ज्यात एका रिपोर्टरचं काम होतं. त्यानिमित्ताने मला एक अभिनेता भेटला. त्याला मी आधी अनेकदा डान्स शिकवला होता. तर तेव्हा तो मला म्हणालेला की, ‘हा अभिनय वगैरे कशाला करतेस? डान्स करतेस तेच ठीक आहे. हे अभिनय वगैरे सोडून दे.’ तेव्हा माझ्या मनाला त्याचं बोलणं खूप लागलं होतं. मला अजूनही ती गोष्ट आठवली की, त्रास होतो. पण आता सगळे माझ्या अभिनयाचं कौतुक करतात, त्यात तोसुद्धा असतो.”
चेतना भट इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर चेतना म्हणते, “अभिनय करू नको असं म्हणालेल्या त्या अभिनेत्याला मी तेव्हा काही बोलले नाही, याचं बरं वाटतं. कारण, आता मी माझ्या कामातूनच सर्वांना उत्तर देत आहे.” तसंच हे सांगताना चेतना भावुकही झाली. यापुढे ती म्हणाली, “आता ऐकलेली गोष्ट आहे. एखाद्या ठिकाणी अभिनेत्री म्हणून नाव सुचवायचं झालं तर लोक म्हणतात की, ती कुठे अभिनेत्री आहे; ती फक्त डान्सर आहे. आताही या गोष्टी बोलल्या जातात. इतकं काम करूनही लोक असं म्हणतात. पण यातून मी हा सकारात्मक विचार करते की, कदाचित तेव्हा मी इतका चांगला डान्स केला आहे की, त्यामुळे मला ते अजूनही डान्सर म्हणून विसरु शकलेले नाहीत.”
यानंतर चेतनाने सांगितलं, “काही लोक माझं नाव सुचवतात, पण जेव्हा आपण चांगलं काम करतो आणि पुढे जातो, तेव्हाच तीच लोक म्हणतात, ही अभिनेत्री नाही. असं कसं होऊ शकतं? तुम्ही दोन्ही बाजूंनी कसे काय बोलू शकता? याचं वाईट वाटतं.”
