‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांसह अनेक कलाकार हे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली नम्रता संभेराव हिचा मुलगा रुद्रराजचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
नम्रता संभेरावने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या लेकाबरोबरचा गोड फोटो पोस्ट केला आहे. यात ते दोघेही मायलेक छान हसताना दिसत आहे. तिने या पोस्टद्वारे रुद्रराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’च्या एका स्किटसाठी किती वेळ लागतो? ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या कलाकाराने दिले उत्तर
नम्रता संभेरावची पोस्ट
“रुद्रराज वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज आमच्या बाळाचा वाढदिवस
आम्ही दोघांनी ठरवलं थोडं जगून घेऊया थोडा वेळ जाऊदे मग चान्स घेऊया,
जगलो हसलो रडलो भांडलो आता जरा आई बाप व्हायचा स्टान्स घेऊया,
वाटलं एखादं लेकरू असावं
ज्याला कडेवर घेऊन मिरवावं
त्याने आई म्हणत उराशी बिलगावं…!एक मात्र मला कळून चुकलं, तुम्ही लेकरं आमच्या इच्छेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार आयुष्यात येता
आणि आम्हा आई बापाच्या जगण्याला खरा अर्थ देताआणि मग स्वप्न आमचं पूर्ण झालं,
उदरी माझ्या लेकरू आलं ..
त्याच्या येण्याने एक आवर्तन पूर्ण झालं
पूर्वी वाटायचं हा मला जीव लावेल का
मी कामावर गेले कि माझ्या मागे धावेल का
पण माझ्या शिवाय त्याच आता पान हलत नाही …
मी कामाला गेले कि तुझ्याविना माझं मन रमत नाही …
कधी कधी मनात खूप अपराधी भावना येते
पण हे सगळं प्रत्येक आई आपल्या बाळा साठी च तर करते
प्रत्येक वेळी त्याच्या आई ह्या हाकेने माझा उर भरून येतो
आई अंगाई म्हण ना ह्या वाक्याने कंठ माझा दाटून येतो
आई मी तुझ्या कुशीत झोपू म्हणजे मला झोप लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र माझी झोप उडते
मग त्याच्या कुशीत जाऊन कधी कधी मी एकटीच रडते
त्याच हसणं बघितलं कि आयुष्य माझं वाढतं
आणि एका गोड बाळाची आई म्हणून थोडं मूठभर मांस देखील चढतं”, असे नम्रता संभेरावने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : “गौरव मोरेच्या पायात खिळा घुसला होता, पण…” निर्मात्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
दरम्यान नम्रता संभेरावच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केले आहे. तर अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवेने या पोस्टवर कमेंट करत “प्रेम प्रेम प्रेम” असे म्हटले आहे. तर खुशबू तावडेने “वाढदिवसाच्या शुभेच्छा रुद्रराज” अशी कमेंट केली आहे.