छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील एक म्हणजे प्रथमेश शिवलकर.

प्रथमेश शिवलकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात लेखन व अभिनय या दोन्ही जबाबदारी सांभाळतो. श्रमेश परब व त्याची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. दोघांचे स्कीट खूप गाजले आहेत. अशा या लोकप्रिय विनोदवीराच म्हणजेच प्रथमेश शिवलकरचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे.

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानचा कधी क्रेझी अंदाज पाहिलात का? अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री चेतना भट्टनंतर प्रथमेशने नवी गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्याचं लाखोंची महिंद्रा थार घेण्याचं स्वप्न होतं; जे आता पूर्ण झालं आहे. महिंद्रा थारबरोबर फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे, “यासाठी केला होता अट्टाहास भाग १. महिंद्रा थार….हे आहेच पण त्यापेक्षा महत्त्वाचं आई, बाबांच्या डोळ्यातला आनंद, समाधान आणि कौतुक…यासाठी केला होता अट्टाहास…बाकी #realoffroadingstartsnow….आणि यासाठी केला होता अट्टाहास भाग २ लवकरच…” प्रथमेशने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये त्याचे आई-वडील पाहायला मिळत आहेत. त्यानंतरच्या फोटोमध्ये प्रथमेश महिंद्रा थारबरोबर दिसत आहे.

प्रथमेशच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेते समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, प्राजक्ता माळी, पृथ्वीक प्रताप, गिरीजा प्रभू, हर्षद अतकरी, नम्रता संभेराव, अक्षया नाईक, अभिषेक गावकर, साक्षी गांधी, इशा डे, अमित फाळके अशा अनेक कलाकारांनी प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहे.

हेही वाचा – Video: साखरपुडा होताच शिवानी सोनार लागली कामाला, दिसणार नव्या भूमिकेत

प्रथमेश शिवलकरचा भाऊ काय करतो?

दरम्यान, प्रथमेशप्रमाणे त्याचा भाऊ रोहित शिवलकर अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. रोहितने प्रथमेशच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्र निवडलं आहे. सध्या रोहित शिवलकर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत मिळत आहे. रोहितच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.