Samir Choughule video : चाहत्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून प्रत्येक कलाकार अगदी जीव ओतून काम करत असतो. चाहत्यांच्या प्रेमापोटी आणि कौतुकासाठी प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो आणि एखाद्या कलाकाराला त्याच्या असंख्य चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं तेव्हा कलाकाराला होणारा आनंद काही औरच असतो. असाच काहीसा अनुभव समीर चौघुलेंना आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमात समीरनं अनेक विनोदी भूमिका आणि स्किट्समधून प्रेक्षकांना हसवलं आहे, त्यामुळे समीर यांचा केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक विनोदी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोशिवाय समीर चौघुले ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ नावाचा कार्यक्रमही सादर करतात.

याच कार्यक्रमानिमित्त समीर चौघुले परदेशात गेले असताना त्यांना चाहत्यांकडून जे प्रेम मिळालं, त्या प्रेमानं समीर भारावून गेले आणि या खास प्रसंगाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समीर चौघुले सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

समीर चौघुलेंना नॉर्वेच्या कार्यक्रमात प्रेक्षकांकडून Standing Ovation मिळालं आणि प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून ते भारावून गेले. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत समीर चौघुले मंचावर येताच सगळे प्रेक्षक उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि पुढे काही वेळ या टाळ्या सतत वाजतच आहेत. तसंच अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या गाजलेल्या स्किटचे बोर्डही हातात घेतल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे रंगभूमी दिनानिमित्त समीर चौघुलेंना हा खास अनुभव आला.

याच अनुभवाबद्दल समीर यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “प्रत्येक कलाकार का जगत असतो? या अश्या काही क्षणांसाठी… माझ्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या कार्यक्रमाच्या नॉर्वेच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी एन्ट्रीला दिलेलं हे Standing Ovation आणि त्यांचा प्रतिसाद, प्रेम थक्क करणारं होतं.”

समीर चौघुलेंसाठी प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट

यापुढे ते म्हणतात, “एखादी क्रिकेट मॅच बघायला जाताना नेतात तसे ‘उंदीर मांजर पकडिंगो’चे पोस्टर्स प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात आणले होते. कार्यक्रम सुरू असताना त्यांना खळखळून हसताना बघितलं की जीवन सार्थक झाल्याचा फील येतो… अश्या अनुभवांपुढे तुम्ही नि:शब्द होता; फक्त एकच गोष्ट करू शकता ‘नतमस्तक होणे. रसिक मायबाप तुम्हाला दंडवत.” दरम्यान, या व्हिडीओला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच या सगळ्यासाठी तो पात्र असल्याच्या प्रतिक्रियासुद्धा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.