Maharashtrachi Hasyajatra Fame Samir Choughule Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षक हसत आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाप्रमाणेच यामधील कलाकारसुद्धा चर्चेत असतात. शोमध्ये अनेक हास्यमहारथी आणि विनोदवीरांची फौज आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते समीर चौघुले. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना आवडतं आणि त्यावर ते पोट धरून हसतातही.
आपल्या विनोदी अभिनयामुळे चर्चेत राहणारे समीर चौघुले सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपल्या कामाबद्दलची माहिती शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना चाहत्यांनी अनेक प्रश्नं विचारली. यात त्यांना एका चाहत्याने ‘आयुष्य कसं जगायचं’ असा प्रश्न विचारला. ज्यावर समीर यांनी आशावादी आणि प्रेरणादायी उत्तर दिलं.
समीर यांनी चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं, “आयुष्य कसं जगायचं? तर मला वाटतं हसत हसत जगायचं. प्रॉब्लेम आणि टेन्शन सगळ्यांनाच असतं. त्यामुळे आपण हसत जगायचं. हसणं ही देवाने दिलेली जगातली फुकट गोष्ट आहे. हसणं ही जगातली सगळ्यात सोपी आणि सुंदर गोष्ट आहे. हसल्याने ताणही कमी होतो, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. माझाही आहे. त्यामुळे हसत राहा.”
समीर यांनी चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्याचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’आधी त्यांनी अनेक विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
नुकताच त्यांचा ‘गुलकंद’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात त्यांच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत होती. समीर आणि सई यांच्यासह अभिनेत्री ईशा डे व अभिनेता प्रसाद ओक हेदेखील प्रमुख भूमिकांत होते.