Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab Dance Video : गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आवडत्या सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाची झलक चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळाली. यंदाच्या गणेशोत्सवात काही कलाकारांनी नवीन गाड्या खरेदी केल्या. तर, काही कलाकारांचं नव्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने सुद्धा मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलं. तिचा पारंपरिक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

यंदा गणपती बाप्पाचं आगमन होण्यापूर्वीच इन्स्टाग्राम रील्सवर “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले…” हे गाणं ट्रेंड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणवासियांनी या गाण्यावर ठेका धरल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहीर विजयबुवा पायकोळी आणि शाहीर रामचंद्र घाणेकर यांचं हे लोकगीत सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. हास्यजत्रेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या शिवाली परबला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे.

शिवाली परबने गणेशोत्सवात “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले…” या लोकगीतावर कोकणी संस्कृतीनुसार जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या वेळी सुंदर पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या लोकगीतावर थिरकताना तिला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रुपेश बनेची साथ मिळाली.

शिवाली आणि रुपेश यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यापूर्वी या दोघांनी गोविंदा आणि शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्यांवर ठेका धरला होता. आता गणेशोत्सवात शिवाली-रुपेशचा पारंपरिक नृत्याविष्कार चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

“शिवाली किती सुंदर डान्स केलास”, “शिवाली अप्रतिम लय भारी डान्स”, “दोघांनीही एनर्जीने डान्स केलाय”, “आपली संस्कृती” अशा विविध प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर युजर्सकडून आल्या आहेत.