Maharashtraci Hasyajatra fame Prabhakar More Garba Dance :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वांचाच लोकप्रिय विनोदी शो. विनोदी स्कीट्स आणि त्यामधील कलाकारांचा अभिनय, यामुळे हा शो गेली काही वर्षं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. त्यांना खळखळून हसवत आहे. त्यामुळे या शोमधील प्रत्येक कलाकारानं चाहत्यांच्या मनात आपलं एक स्थान निर्माण केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोनं अनेक नव्या कलाकारांना ओळख आणि प्रसिद्धी दिली. तसेच काही जुन्या चेहऱ्यांनासुद्धा प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यापैकीच लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे.

आपल्या खास शैलीत कोकणी भाषा व त्या भाषेतील विविध भूमिका साकारणारे आणि अचूक टायमिंगने हसवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रभाकर मोरे. या विनोदी कार्यक्रमात ते अनेक स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे प्रभाकर मोरे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते फोटो-व्हिडीओ तसेच काही प्रसंग किंवा आठवणी शेअर करताना दिसतात.

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अशाच एका नवरात्रीच्या कार्यक्रमात प्रभाकर मोरे सहभागी झाले होते. डोंबिवलीमधील नवरात्रीच्या कार्यक्रमात प्रभाकर मोरे सहभागी झाली असून, या कार्यक्रमाचे काही खास क्षण प्रभाकर मोरेंनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

या पोस्टमधून ते अनेक चाहत्यांच्या गर्दीत हरवल्याचे दिसत आहेत. तसंच अनेक चाहते त्यांच्या लहान मुलांचे प्रभाकर मोरेंबरोबर फोटो काढत आहेत, तर प्रभाकर मोरेसुद्धा या भरगर्दीत आपल्या प्रत्येक चाहत्याबरोबर फोटो आणि सेल्फी काढत आहेत. तसंच प्रभाकर मोरेंनी चाहत्यांबरोबर गरबा नृत्यदेखील केलं.

प्रभाकर मोरे इन्स्टाग्राम पोस्ट

प्रभाकर मोरेंच्या याच साधेपणाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोखालील कमेंट्समध्ये अनेकांनी प्रभाकर मोरेंबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “जबरदस्त प्रभाकरदादा”, “कोकणी माणूस एकदम साधा भोळा असतो, याचं उदाहरण म्हणजे प्रभाकर मोरे”, तसंच अनेक चाहत्यांनी लाइक्सद्वारे आणि हार्ट इमोजीद्वारे या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्रभाकर मोरे हे विनोदी कार्यक्रमांबरोबरच काही सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातील ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात त्यांच्याबरोबर अभिनेत्री धनश्री काडगांवकरही आहे.