Rutuja Bagwe Praises Siddharth Bodke : सिद्धार्थ बोडके मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज ३१ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामधून तो पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून झळकणार आहे. अशातच त्याची मैत्रीण ऋतुजा बागवेने त्याचं कौतुक केलं आहे.

सिद्धार्थ बोडके, ऋतुजा बागवे, अनघा अतुल हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत. अनेकदा ते एकमेकांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक करत असतात. एकमेकांना पाठिंबा देत असतात. अशातच आता ऋतुजानेही सिद्धार्थचं कौतुक करत त्याच्या सिनेमानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

ऋतुजा बागेवेची सिद्धार्थ बोडकेसाठी भावुक पोस्ट

ऋतुजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सिद्धार्थचं कौतुक करत म्हटलं की, “प्रिय सिद्धार्थ, आज तुला मोठ्या पडद्यावर खूप महान व्यक्तिमत्व साकारताना पाहिलं, जादू करताना पाहिलं आणि अभिमानाने उर भरून आला, डोळे पाणावले… हाच तो आमचा सिद्धुड़ी ‘अनन्या’ नाटकात स्टेजवर एंट्री घेण्याआधी चिंताग्रस्त असायचा, पाण्याच्या दोन बाटल्या संपवायचा आणि स्टेजवर पाऊल ठेवताच पहिल्या चार वाक्यात प्रेक्षकांची मनं जिंकायचा, जादू करायचा, प्रवेश संपेपर्यंत प्रेक्षकांना आपल्या भूमिकेच्या प्रेमात पाडायचा.”

सिद्धार्थबद्दल ऋतुजा पुढे म्हणाली, “सहकलाकार म्हणून कायम वाटायचं प्रेक्षक म्हणून ह्याचं काम पाहायला काय मजा येत असेलं. त्याच्या अभिनयातली सहजता मी कधी आत्मसात केली मला कळलचं नाही. पुढ़े त्याची अनेक कामं प्रेक्षक म्हणून एंजॉय केली. ‘सॅड सखाराम’ नाटकामधलं तुझं काम पाहून, तू माझ्या आवड़त्या कलाकरांच्या यादीत क़ायमस्वरूपी जागा केलीस, ज्या कामातून मला प्रेरणा मिळते.”

मित्राचं कौतुक करत ऋतुजाने पुढे लिहिलंय की, “मी मनापासून कायम प्रार्थना केली की तुला तुझ्या पोटेंशियलचं कडक प्रोजेक्ट मिळो आणि आजचा तो दिवस मी जवळून पाहिला आणि त्या संधीचं तू सोनं केलस. ही भूमिका खूप जबाबदारीची आणि कठीण होती आणि तू ती लीलया पेलली आहेस, तू खूप सहज सुंदर आणि खूप खरं काम केलयस. महाराजांचे डोळे कसे असतील असा कायम मनात विचार यायचा. आज ते डोळे सापड़ले आणि कलाकार, अभिनेता म्हणून तू जिंकलास.”

ऋतुजाने केलं तितीक्षा तावडेचं कौतुक

“वर्षभरातील सगळे पुरस्कार, प्रेक्षकांचं प्रेम, आणि उत्तमोत्तम भूमिका तुझ्या वाट्याला येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, खूप प्रेम लाडका मित्र, आवड़ता अभिनेता,” असं म्हणत त्याला खाली टॅग केलं आहे. पुढे तिने तितीक्षा तावडेचंही कौतुक केलं आहे. ती म्हणाली, “आमची लाडकी वहिनी तुझं विशेष कौतुक, तू क़ायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेस, त्याच्या ह्या यशात तुझा मोलाचा वाटा आहे.”