Actress Responds To Divorce Rumours : सोशल मीडिया हा कलाकार आणि प्रेक्षकांमधील दुवा बनला आहे. यामार्फत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मतं थेट कलाकारांपर्यंत पोहचत असतात. पण, अनेकदा याचा दुरुपयोगही होताना दिसतो. कलाकार मंडळी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यातील दैनंदिन गोष्टीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र, यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. काही कलाकार यावर थेट त्यांच्या प्रतिक्रिया देतात तर काही याकडे दुर्लक्ष करतात.
छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच याबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे माही विज. माहीने आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिने ‘अकेला’ या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर तिने ‘शुभ कदम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आणि या मालिकेनंतर ती मुख्य नायिका म्हणून नावारुपाला आली.
माही तिच्या व्यावसायिक व खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिची मुलगी व नवऱ्याबरोबरचे रील पोस्ट करायची. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या घटस्फोटाबद्दलच्या चर्चांना उधाण आलेलं. माहीने प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीसह लग्न केलं होतं. या जोडीच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. या दोघांना तारा नावाची एक गोंडस मुलगीदेखील आहे.
सध्या माही व जय यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू आहेत. अशातच आता माहीने नुकतीच यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने याबाबत सांगितलं आहे. यामध्ये तिला “तुझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे का” असं विचारण्यात आलेलं. यावर अभिनेत्रीने आधी “नाही” असं उत्तर दिलं, परंतु नंतर ती अफवांमुळे तिला ट्रोल करणाऱ्यांबद्दल म्हणाली, “घटस्फोट घेण्याची शक्यता असली काय किंवा त्या अफवा खोट्या असल्या काय, याबाबत मी तुम्हाला का सांगू.”
माही पुढे म्हणाली, “तुम्ही माझे काका आहात का? की तुम्ही माझ्यासाठी चांगला वकील शोधणार आहात?” यासह अभिनेत्रीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “काही वेळेला ते कमेंटमध्ये लिहितात की माही चांगली आहे, पण जय नाही, तर कधी जय चांगला आहे पण माही नाही असंही लिहितात. मुळात तुम्हाला आमच्याबद्दल काय माहीत आहे? आम्हाला जज करणारे तुम्ही कोण आहात?”
माहीने पुढे एकल पालकत्वाबद्दलही तिचं मत मांडलं आहे. ती म्हणाली, “एकल पालकत्व किंवा एकट्याने मुलांचा सांभाळ करणाऱ्या आईबद्दल खूप काही बोललं जातं. यांचा घटस्फोट होणार आहे, काही तरी गडबड झाली असणार. आता हे दोघे एकमेकांच्या विरोधात बोलतील असं खूप काय काय बोललं जातं. मला असं वाटतं, सामाजिक दबाव खूप आहे. लोक काय म्हणतील हा विचार खूप त्रासदायक आहे. मला एवढंच वाटतं, जगा आणि जगू द्या.”