मानसी साळवी या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी केवळ मराठीतच नाही, तर हिंदीतही महत्त्वाच्या भूमिका साकारत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मराठी-हिंदी मालिका, जाहिराती आणि मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मानसी यांनी आजवर ‘आशीर्वाद’, ‘असंभव’, ‘खेळ मांडला’, ‘आई शप्पथ’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी मानसी यांनी ‘आरपार’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मानसी यांनी इंडस्ट्रीतील त्यांचा एकूण अनुभव सांगितला होता. त्यांच्या प्रसिद्ध मालिका, जाहिरातींबद्दलच्या आठवणी त्यांनी यामध्ये सांगितल्या. तसेच, मानसी यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही सागितलं. मानसी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांना ओमिशा नावाची एक १७ वर्षांची मुलगी आहे. तिच्याबद्दलही त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “माझी मुलगी १७ वर्षांची आहे. आम्हा मायलेकींचं एकमेकींशी घट्ट नातं आहे. मी तिच्याबरोबर कुठल्याही विष्यावर बोलू शकते. त्यामुळे ती मला मैत्रिणीसारखी आहे.”

पुढे मानसी यांनी यामध्ये एकल पाकत्वाबद्दलही मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या, “मला सिंगल मदर हा प्रकार पटत नाही. सिंगल मदर काय असतं? आई ही एकच असते. त्यामुळे हे मला पटत नाही. माझं माझ्या मुलीशी घट्ट नातं असून, ती अनेकदा बऱ्याच नवनवीन गोष्टी मला सांगत असते. परंतु, जेव्हा मी ओमिशाच्या इतर मित्र-मैत्रिणींना त्यांच्या आई-बाबा अशा दोन्ही पालकांबरोबर बघते तेव्हा मी तिला इतर मुलांप्रमाणे सामान्य कुटुंबात वाढवू शकत नसल्यानं तिची माफी मागते. परंतु, ओमिशा याबाबतसुद्धा मला समजून घेते आणि तू मला व माझ्या मित्र-मैत्रिणींना खूप आवडतेस, असं ती म्हणते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दलही वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “माझा घटस्फोट होऊन १० वर्षं झाली. मी सार्वजनिक ठिकाणी याविषयी कधीच व्यक्त होत नाही. कारण- मला ते योग्य वाटत नाही. पण, पालकत्व अवघड आहे. मुलांचा सांभाळ करणं तितकं सोपं नाही. पण, गेली १० वर्षं ओमिशा माझ्याबरोबर आहे. तिनं मला या सगळ्यातून जाताना पाहिलं आहे. त्यामुळे आता आमचं नात इतकं घट्ट आहे की, मी तिच्यासमोर ढसाढसा रडूही शकते.” पुढे मुलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “ओमिशाला पुस्ताकांची प्रचंड आवड असून, ओमिशा तिच्या वयापेक्षाही जास्त समजूतदार आहे”.