Amey Wagh Shares Thought on Standup Comedy: अभिनेता अमेय वाघ सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमामुळे तो काही दिवसांपासून चर्चेत आहे.
आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने विनोद कसा असावा, यावर वक्तव्य केले. अमेय वाघने नुकतीच सकाळ प्रीमियरला मुलाखत दिली. सध्या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार खूप गाजतोय. कधी कधी वादही निर्माण होतात. अनेकदा भावना दुखावल्या जातात. तूसुद्धा अनेकदा विनोद केलेले आहेस. त्यामुळे यावर तुला काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला.
कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील…
त्यावर बोलताना अमेय वाघ म्हणाला, “मला असं वाटतं की विनोद ही अशी गोष्ट आहे की, प्रत्येकाची विनोद सहन करण्याची जी ताकद असते, ती वेगळी असते. घरातील लोक, मित्र किंवा नातेवाइकांची चेष्टा केली तरी कधीतरी कुणीतरी दुखावलं जाऊ शकतं. तर विनोद ही अशी गोष्ट आहे, जी सहन करण्याची प्रत्येकाची वेगळी ताकद असते. कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही”.
“आज तर काळच असा आहे की, सोशल मीडियामुळे कुठल्याही विनोदावर लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळते. त्यामुळे थोडं धोकादायक वाटतं आणि हे काही कुठल्या राजकीय परिस्थितीशी निगडित आहे, असं मला वाटत नाही. एकूणच विनोदाबद्दलची आपली सहनशक्ती कमी झालीय की काय, असं मला वाटतं”.
अमेय वाघ असेही म्हणाला, “कमरेखालचा विनोद केला जाणार नाही, असा कलाकारांनी प्रयत्न करावा. शिव्यांमधून विनोद तयार करणं खूप सोपं असतं. अपमान करून, त्यातून विनोद तयार करणं सोपं असतं. पण, त्या शिव्या न वापरता तुम्ही जेव्हा विनोद निर्मिती करता, ते खूप आव्हानात्मक आहे, असं मला वाटतं”.
‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाबद्दल अमेय वाघ म्हणला, “मी गेल्या ५-६ वर्षांत जास्तीत जास्त पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाचं काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षांत मी टीव्हीवरील कार्यक्रम केला नव्हता. मी आतुरतेनं वाट बघत होतो. माझ्याकडे कोणीतरी असा कार्यक्रम घेऊन यावं. जिथे स्पर्धक काय टॅलेंट दाखवतात फक्त यावर आधारित न राहता, जर जास्त मजा-मस्ती करता येईल. तिथे सूत्रसंचालक म्हणून माझासुद्धा कस लागेल. पुरस्कार सोहळ्यात एक ठरलेला फॉरमॅट असतो. या शोमध्ये तसं नाहीये.”
दरम्यान, शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात निक्की तांबोळी, धनंजय पोवार, रूपाली भोसले, मधुराणी प्रभुलकर, गौतमी पाटील असे अनेक कलाकार सहभागी झाल्याचे दिसत आहे.