Marathi Actor New Home : मुंबईत हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच स्वप्न ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावने पाहिलं होतं. कपिलचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याने मुंबईत सुंदर घर खरेदी केलं आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.
कपिलने पत्नीसह नुकताच या नव्या घरात गृहप्रवेश केला. याची खास झलक अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्याने अंधेरीत नवं घर खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. नव्या घरातील गृहप्रवेश पूजेचा व्हिडीओ शेअर करत कपिलने भावुक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता म्हणतो, “स्वप्न ते सत्य… दोन दिवस झाले आम्ही नव्या घरात गृहप्रवेश केला. आजही, हे सत्य आहे की स्वप्न तेच समजत नाहीये… अजून विश्वास होत नाहीये…१५ वर्षे भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालीये की….भाड्याच्या घरात राहताना रूममध्ये काहीही नवीन करायचं झालं तर सर्वातआधी घर मालकाची परवानगी घ्यावी लागत होती. कालपासून घर सेट करताना, तिथे नको आधी विचारूया… हे आपसूक बोलून जात होतो.”
“आई-वडिलांचा आशीर्वाद, रेनूची साथ, लहान भाऊ आणि बहिणीचं भक्कम पाठबळ या सगळ्यामुळे हे सगळं शक्य झालं. आपण यशस्वी झाल्यावर आपल्या आई-वडिलांना आपला अभिमान वाटतो…त्यांच्या चेऱ्यावरचा आनंद पाहून सतत भरून येत होतं. माझ्या बायकोशिवाय हे शक्यच झालं नसतं… माझा संघर्ष फक्त माझा एकट्याचा नव्हता तर तो तितकाच माझ्या पत्नीचाही होता… आणि शेवटी तुम्हा सगळ्यांचेही खूप खूप आभार… मला माझ्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेसाठी इतका छान प्रतिसाद तुम्ही दिलात. त्यामुळेच मी आज यशस्वी होऊ शकलो.” असं कपिल होनरावने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता मराठी कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, कपिल होनरावच्या कामाबद्दल सांगायंचं झालं तर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर कपिल ‘जय जय शनिदेव’, ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत झळकला होता.
