अभिनेते किरण माने हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी तल्लख बुद्धीच्या जोरावर ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५ मध्ये जागा मिळवली. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. किरण माने यांना नुकताच सम्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्यांनी त्याला कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “… म्हणून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात काम करण्याची संधी हुकली”, किरण मानेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले “बिग बॉस…”

किरण माने यांची पोस्ट

“…ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा ‘सम्यक पुरस्कार’ यावर्षी मला जाहीर झाला आहे. १० मे रोजी पुण्यात कष्टकर्‍यांचे कैवारी मा. डाॅ. बाबा आढाव यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जाणार आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला आणि डोळ्यांत पाणी तरळलं. वाटलं, मी एवढ्या मोठ्या सन्मानासाठी पात्र आहे का? बर्‍याचजणांना हे ही वाटेल की याचं काय एवढं मोठं काम? आंबेडकर कुटूंबीय आणि पुरस्कार समितीनं असं काय पाहिलं असावं माझ्यात? फुले आंबेडकर जयंतीवेळी गांवोगांवी जाऊन व्याख्यानं देणं… बुद्ध जयंती-तुकाराम बीजेचं वगैरे निमित्त साधुन बुद्ध-तुकाराम यांच्यातल्या संबंधांवर गांवखेड्यातल्या बुद्धविहारात जाउन भाषणं देणं… हे सगळं शुटिंगमधून वेळ मिळेल तसं. इतरवेळी अधूनमधून फेसबुक पोस्टमधून शिव-शाहू-फुले-आंबेडकरी आणि तुकोबांच्या विचारांचा प्रसार करणं… यापलीकडं फार मोठ्ठं योगदान नाही माझं. दुसरं म्हणजे हे सगळं मी कुठल्या मानसन्मानासाठी नाही करत. माझा आनंद आहे यात. मला अभिनयातून जेवढं समाधान मिळतं तेवढंच या गोष्टींतूनही मिळतं. हे सगळं मी ‘स्वान्तसुखाय’ करतो.

…याची दखल थेट आंबेडकर कुटूंबियांनी घेणं हे माझ्या काळजाला स्पर्श करून गेलंय. कदाचित माणसामाणसात फूट पाडू पहाणार्‍या आजच्या भवतालात, रंगमंचावर-पडद्यावर विविध भुमिका साकारणार्‍या एका अभिनेत्यानं, सामाजिक ‘भुमिका घेणं’ हे त्यांना महत्त्वाचं वाटलं असावं. केवळ त्या भावनेचा आदर म्हणून मी हा पुरस्कार स्विकारणार आहे.

मी लहान असताना माझे वडील मला डाॅ.बाबा आढावांची भाषणं ऐकायला मायणीहून सातारला घेऊन जायचे. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार आहे, हे माझ्यासाठी किती मोलाचं आहे ते मी शब्दांत नाही सांगू शकत. आत्ता हे लिहीतानाही हात थरथरताहेत.

माझ्यावर मोलाचे संस्कार करणार्‍या डाॅ.आ.ह.साळुंखे तात्यांचा माझ्या जडणघडणीत अतिशय मोलाचा वाटा आहे. सगळं श्रेय त्यांचं आहे. मी निमित्तमात्र.

धन्यवाद बाळासाहेब… धन्यवाद पुरस्कार समिती. जयभीम”, असे त्यांनी किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी बिग बॉसमध्ये गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या संघर्षाबद्दल सांगायचो” किरण मानेंचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले “यावरुन मला टार्गेट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. त्यांना नुकताच सम्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने अनेक चाहते कौतुक करताना दिसत आहे.