Priyanka Ketkar Angry Post On Nashik Malegaon Case : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचं वृत्त सुन्न करणारं आहे. या घटनेबद्दल राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीसुद्धा या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने आपल्या सोशल मीडियावर या घटनेसंबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओमधून तिने चिमुकलीवरील अत्याचाराबाबत संताप व्यक्त केला आहे. तसंच मराठी अभिनेता शशांक केतकरची पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका केतकर हिनेही याबद्दल आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रियांका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच काही सामाजिक घटनांबद्दलही ती व्यक्त होताना दिसते. अशातच मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचाराबाबत प्रियंकाने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय, “या घटनेनं मी अगदी हादरूनच गेली आहे… माणुसकी कुठे हरवली आहे? ती फक्त ३ वर्षांची निरागस मुलगी होती. या विकृत लोकांना नेमकं काय झालं आहे?”
यापुढे प्रियांका म्हणते, “वकील म्हणून माझा याबद्दल आणखीच संताप होतो, कारण अशा गुन्हेगारांना स्वतःचा बचाव करण्याची आणि जामीन मिळवण्याची संधी मिळते याचीही घृणा वाटते. आपली न्यायव्यवस्था खरंच एवढी कमजोर आहे का? अशा राक्षसी कृत्य करणाऱ्यांना फक्त फाशी नव्हे, त्यांना जिवंत जाळण्याची गरज आहे.”
मालेगाव अत्याचार प्रकरणी प्रियांका केतकरची पोस्ट

खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली चिमुरडी घरी परतली नाही. गावकऱ्यांनी बरीच शोधाशोध केल्यावर रात्री गावालगतच्या मोबाईल टॉवरजवळील झाडाझुडुपांमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून बालिकेची हत्या करण्यात आल्याचा संशय बळावल्याने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. न्यायालयाने आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. तसंच हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.
