Marathi Actress Madhuri Pawar Shifted to Mumbai : ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार हिची स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत एंट्री झाली आहे. ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका करून लोकप्रियता मिळवणारी माधुरी पुन्हा टीव्हीवर परतली आहे. उत्तम नृत्यांगना असलेली माधुरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने मुंबईत राहण्याबद्दल नुकतीच एक पोस्ट केली आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत नव्या भूमिकेत झळकणारी माधुरी पवार हिने चाहत्यांबरोबर एक मोठी अपडेट शेअर केली आहे. माधुरी या मालिकेच्या निमित्ताने मुंबईत राहायला आली आहे. माधुरी मूळची साताऱ्याची आहे, पण आता ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेसाठी ती सातारा सोडून मुंबईत शिफ्ट झाली आहे. तिने मुंबईतील घराचे काही फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

फोटोंमध्ये माधुरी घराच्या गॅलरीत बसलेली दिसतेय. “झाले बाबा एकदाचे मुंबईत शिफ्ट
सातारा – मुंबई – सातारा करण्यापेक्षा ‘जीवाची मुंबई’ काय असतंय ते एकदा करूनच बघू म्हणलं..!!” असं कॅप्शन माधुरीने या फोटोंना दिलं आहे.

माधुरी पवारची पोस्ट

माधुरीच्या या पोस्टवर कमेंट्स करून काही चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत. मुंबईत फ्लॅट घेतलास का? यावर नाही. मुंबईत शिफ्ट झालेय, असं उत्तर माधुरीने दिलं. तर काही जणांनी तुझं मुंबईत हक्काचं घर व्हावं असं म्हणत माधुरीला शुभेच्छा दिल्या. त्यांचे माधुरीने आभार मानले.

दरम्यान, माधुरी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे व डान्सचे लाखो चाहते आहेत. मराठी इंडस्ट्रीत काम करत असली तरी माधुरी साताऱ्यातच राहत होती, ती साताऱ्यातच जन्मली व मोठी झाली. त्यामुळे ती साताऱ्यातच राहायची. तिचे वडील घरांचं बांधकाम करायचे, त्यामुळे त्यांना काम मिळेल तिथे फिरावं लागायचं. शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी माधुरीला तिच्या आजीजवळ ठेवलं होतं. ती आजीसोबत पत्र्याच्या झोपडीत राहायची. त्याच घरात राहून तिने शिक्षण पूर्ण केलं आणि तिची डान्स व अभिनयाची आवड जपत करिअर केलं.

माधुरी पवारचं ड्रीम होम कसं आहे?

बरीच वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत असली तरी माधुरी साताऱ्यातही भाड्याच्या घरात राहत होती. माधुरीचं स्वप्नातलं घर कसं आहे, याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “मी माझ्या आई-बाबांसाठी एक छोटसं साजेसं घर घेतलं आहे. पण माझं ड्रीम हाऊस वेगळंच आहे. मला खूप मोठं नाही, पण चार खोल्यांचं घर असावं असं वाटतं. त्यात स्वयंपाकघर, हॉल, माझी खोली आणि एक पाहुण्यांसाठी खोली असेल. मला कौलारू घरं खूप आवडतात. कोकणातील घरांसारखं घर मला हवं आहे. माझ्या घरात कोणत्याच सुखसोईंचा अभाव नसावा. बाहेरून साधं वाटत असलं तरी घरात आल्यावर सर्व सोई-सुविधा उपलब्ध असाव्या,” अशी इच्छा माधुरीने व्यक्त केली होती.