‘अशोक मा.मा.’ फेम मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर हिने काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली. त्यापूर्वी रसिकाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते, पण त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे रसिकाचा होणारा पती नेमका कोण, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
रसिकाने शुभांकर उंब्रानी याच्याशी साखरपुडा केला आहे. ७ सप्टेंबरला रसिकाने साखरपुड्याचे फोटो शेअर करत शुभांकरचा चेहरा दाखवला. रसिकाचा होणारा पती हा इंडस्ट्रीतला नाही. रसिकाने सांगितलं की तिला अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको होता. तर, शुभांकर उंब्रानी नेमकं काय करतो? तो कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, याची माहिती रसिकाने अल्ट्रा मराठी बझशी बोलताना दिली.
रसिका व शुभांकर अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेण्याआधी दोन महिने वेळ घालवला. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले होते. सगळं अनपेक्षित घडलं. अभिनय क्षेत्रात काम करतेय, त्यामुळे पाठिंबा देणारा जोडीदार व कुटुंब हवे होते, असंही रसिकाने नमूद केलं.
काय करतो रसिका वखारकरचा होणारा पती?
शुभांकरबद्दल रसिका म्हणाली, “तो अजिबात या क्षेत्राशी संबंधित काहीच करत नाही. मलाही तेच हवं होतं. अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको, अशीच माझी इच्छा होती. शुभांकरचा फॅमिली बिझनेस आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो. त्याला अभिनय क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचं कुतूहल आहे.”
होणाऱ्या सासू-सासऱ्यांना आहे रसिकाचं कौतुक
रसिका सासू-सासऱ्यांबद्दल म्हणाली “त्यांनी माझं काम पाहिलं आहे. मला कामासाठी प्रोत्साहन देणारं कुटुंब हवं होतं. त्यांना माझ्या कामाचं खूप कौतुक असतं, ते मला याबद्दल विचारत असतात. त्यांना नाटक, सिनेमे बघायला आवडतात, ते खूप हौशी आहेत. ते माझी मालिका बघत असतात.”