Marathi Actress Rasika Wakharkar Post : अलीकडच्या काळात सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी हे कलाकार इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमुळे अभिनेत्री खऱ्या आयुष्यात ‘कमिटेड’ झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतून अभिनेत्री रसिका वखारकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “एक नवीन सुरुवात…काय आहे Guess करा… Love In The Air” असं कॅप्शन देत रसिकाने एका व्यक्तीसह फोटो शेअर केला आहे. आता अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ नेमका कोण आहे याचा खुलासा अद्याप रसिकाने केलेला नाहीये. मात्र, तिच्या पोस्टवर मराठी कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
रसिकाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती समोरच्या व्यक्तीकडे हसुन बघत असल्याचं पाहायला मिळतंय, याशिवाय या फोटोमध्ये तिच्या हातातील अंगठी लक्ष वेधून घेत आहे. तर, अभिनेत्रीने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये समुद्रकिनारी रसिका आणि तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती हातात हात घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळतंय.
तन्वी मुंडले, सीमा घोगळे, कांची शिंदे, ऐश्वर्या शेटे, शुभवी गुप्ते या कलाकारांनी रसिकाच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी रसिकाच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती नेमकी कोण आहे याबद्दल गेस करण्यास सुरुवात केली आहे.
फोटोवरील कमेंट्स सेक्शनमध्ये अनेकांनी तो मुलगा अभिनेता इंद्रनील कामत आहे अशा कमेंट्स केल्या आहेत. कारण, यापूर्वी दोघांनीही ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं आणि त्यावेळी या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे इंद्रनील असेल असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी, “आता चेहरा कधी दाखवणार”, “लवकर तुझ्या आयुष्यातील खास व्यक्तीचा चेहरा रिव्हिल कर” असं कमेंट्स म्हटलं आहे.

आता रसिकाने सोशल मीडियावर खरंच प्रेमाची कबुली दिलीये का? तिच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती नेमकी कोण असेल? की अभिनेत्रीचा नवीन प्रोजेक्ट येतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना लवकरच मिळणार आहेत.