Marathi Actress Rutuja Chipade : मालिकाविश्वात काम करणारे कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय होतात. छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अशाच एका अभिनेत्रीने नुकतीच प्रेक्षकांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत या अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ या मालिकेने १५ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जायची आणि या मालिकेने जवळपास ९१४ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. छोट्या पडद्यावर जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवल्यामुळे या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते. या मालिकेत काजल ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा चिपडे साकारत होती.
‘लग्नाची बेडी’ मालिका संपल्यावर ऋतुजाने मालिकाविश्वातून काही दिवस ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. आता ऋतुजाच्या घरी लवकरच चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे.
गडद हिव्या रंगाची साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात सुंदर नेकलेस असा पारंपरिक लूक करून अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचं तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंना “आयुष्यातील सुंदर क्षणांची सुरुवात” असं कॅप्शन देत ऋतुजाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
ऋतुजाने यापूर्वी ‘हिमालयाची सावली’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘बायको अशी हवी’, ‘सुंदरी’, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘यशोदा’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
दरम्यान, ऋतुजाने आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर करताच तिला मराठी मालिकाविश्वातील कलाकारांनी तसेच नेटकऱ्यांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.