Marathi Actress Sakshee Gandhi New Home : प्रिया बापट-उमेश कामत, अमृता खानविलकर, स्वानंदी टिकेकर अशा मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत नवीन घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. आता यांच्यामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, या अभिनेत्रीने मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर कोकणातील चिपळूण येथे घर घेतलं आहे. या नव्या घराची झलक या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच साक्षी गांधी. आजवर टेलिव्हिजनवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये साक्षीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या साक्षी वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने चिपळूण येथे नवीन घर घेतलं आहे. याची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर करत अभिनेत्रीने या व्हिडीओला “…आणि घर झालं #चिपळूण #नवीन घर गणपती बाप्पा मोरया” असं कॅप्शन दिलं आहे.
साक्षीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे कुटुंबीय नव्या घराची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंटिरिअर करण्याआधी व त्यानंतर घराला कसं सजवलंय याची सुद्धा झलक अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे चाहत्यांना दाखवली आहे. या सगळ्यात लक्ष वेधून घेते ती अभिनेत्रीच्या घराची नेमप्लेट.
अभिनेत्रीच्या नव्या घराच्या दारावरच्या पाटीवर सर्व कुटुंबीयांची नावं लावली आहेत. “श्री. महेश सौ. शर्मिला साक्षी क्षितिजा गांधी” असं या नेमप्लेटवर लिहिण्यात आलं आहे. साक्षीचं नवं घर पाहताच सिनेविश्वातील तिच्या मित्र-मैत्रिणींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आकाश नलावडे, रेश्मा शिंदे, अभिषेक राहाळकर, रोहन गुजर, सुकन्या मोने, मधुरा जोशी, अनघा अतुल, सुनील बर्वे, अश्विनी महांगडे, शर्वरी जोग, खुशबू तावडे या सगळ्यांनी साक्षीचं नव्या घरासाठी भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, साक्षी गांधीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नव्या मालिकेत यमुना ही भूमिका साकारत आहेत. यापूर्वी अभिनेत्री ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘नवी जन्मेन मी’ या मालिकांमध्ये झळकलेली आहे.