Marathi Actress Sonali Khare Comeback On Television : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता ‘नशीबवान’ आणि ‘लपंडाव’ या नव्याकोऱ्या मालिकांच्या प्रोमोने सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘नशीबवान’ मालिकेत अजय पूरकर, नेहा नाईक, प्राजक्ता केळकर यांच्यासह आणखी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. ती कोण आहे जाणून घेऊयात…

‘नशीबवान’ मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे सोनाली खरे. मालिकाविश्वात दमदार एन्ट्री घेण्यासाठी ती सज्ज होत आहे. याआधी ‘स्टार प्रवाह’च्या ‘बे दुणे दहा’ या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती. ‘नशीबवान’ मालिकेच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच खलनायिका साकारणार आहे.

अभिनेत्री साकारणार ‘ही’ भूमिका

सोनाली खरे ‘नशीबवान’ मालिकेत साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे उर्वशी. दिसायला अतिशय सुंदर मात्र रुपाचा प्रचंड गर्व असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. कोणत्याच भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.

उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणते, “स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे माझं आवडतं माध्यम आहे. मी आता ‘नशीबवान’ मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. त्यातही पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात झळकणार आहे. खूप उत्सुकता आहे… मध्यंतरीच्या काळात चित्रपट, वेबसीरिज आणि माझी निर्मिती संस्था या सगल्या कामात मी प्रचंड व्यग्र होते. मात्र, तरीही मालिकेत काम करण्याची खूप इच्छा होती.”

 Sonali Khare Comeback On Television
Sonali Khare Comeback On Television

“या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी नावाजलेली निर्मिती संस्था असा छान योग जुळून आला आहे. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुध्द आहे त्यामुळे कस लागतोय. गणेशोत्सवाच्या धामधूमीत या मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आणि नशीबवान मालिका आवडेल याची खात्री आहे.” असा विश्वास सोनाली खरेने व्यक्त केला आहे.

 Sonali Khare Comeback On Television
Sonali Khare Comeback On Television

दरम्यान, ‘नशीबवान’ ही मल्टीस्टारर मालिका येत्या १५ सप्टेंबरपासून रोज रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.