Marathwada Flood Marathi Actor Help : महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी पुरामुळे घरे कोसळली आहेत, रस्ते वाहून गेले आहेत, तसेच शेतीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झालं आहे. या पुरामुळे मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांतील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे राज्य शासन आणि काही संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अशातच मराठी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीसुद्धा मदत जाहीर केली आहे. तसंच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना आणि इतरांना मदतीचं आवाहन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मदतीचा व्हिडीओ शेअर केला होता. अशातच आता मराठी अभिनेता सौरभ चौघुले आणि इतर काही कलाकारसुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सौरभ चौघुले, ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणे यांच्याकडून मदत केली जात आहे. याबद्दलचा व्हिडीओ सौरभने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे, तसंच या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने इतरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.

या व्हिडीओमध्ये सौरभ म्हणतो, “नमस्कार, आज मी तुमच्यासमोर एका कारणासाठी आलोय, ते कारण म्हणजे सोलापूर, बीड, मराठवाडा या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात… मराठवाड्यातील शेतकरी बांधवाला आज आपली गरज आहे. तिथे त्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद, कल्याण शाखेतील कलाकार ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही स्वखुशीने शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू देऊ शकता, ज्यात बिस्कीट्स, सुका खाऊ देऊ शकता; कारण त्यांना याची आता खूप गरज आहे. पावसामुळे तिथे वीज नाहीये, त्यांना जेवणाच्या समस्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी स्नॅक्स पाठवत आहोत.”

सौरभ चौघुले इन्स्टाग्राम व्हिडीओ

पुढे सौरभ म्हणतो, “यासाठी कल्याणमधील अत्रे मंदिर येथे संध्याकाळी ४ ते ८ वाजता सगळे कलाकार आणि कार्यकर्ते असणार आहेत; तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा. आज आपल्या शेतकरी बांधवाला आपली गरज आहे, त्यासाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे.” दरम्यान, सौरभच्या या कृतीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.