केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसंच त्याच्यासह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचे दोन धमाकेदार टीझर प्रदर्शित झाले. त्यामुळे ‘झापुक झुपूक’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी केदार शिंदे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी केदार शिंदे यांच्याबरोबर फोटो शेअर करत लिहिलं, “केदार शिंदे आणि माझी अनेक वर्ष मैत्री आहे. पहिल्यांदा केदार यांना मी ‘फिल्मसिटी’मध्ये १९९५-९६ला ‘असंच पाहिजे नवंनवं’ या माझ्या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटलो होतो. केदार अंकुश चौधरी यांना भेटायला आले होते, दोघांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यानंतर ‘मराठा बटालियन’साठी निर्माते वासवानी यांना एक उत्कृष्ट लेखक हवा होता. त्यावेळेला मी केदार शिंदे यांना ‘मराठा बटालियन’चे डायलॉग लिहिण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे ‘मराठा बटालियन’ या चित्रपटाचे काही सीन्स केदार यांनी लिहिले आहेत. मग एकदा ‘हसा चकटफू’ या त्यांच्या मालिकेमध्ये मला निवेदकाची भूमिका त्यांनी दिली होती. या सगळ्या गोष्टींना २९-३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.”

“मधल्या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सुंदर सिनेमे केले, पण आमचा एकत्र काम करायचा कधी योग आला नाही. अचानक माझी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली आणि केदार त्यांचा जिओ स्टुडिओ बरोबरचा ‘झापुक झूपूक’ या चित्रपटामध्ये ‘पंजाबराव’च्या भूमिकेसाठी मला विचारलं. मी एका क्षणाचा विलंब न करता ‘हो’ म्हणालो. केदारबरोबर काम करायची माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झालीय. अतिशय सुंदर पद्धतीने माझं या चित्रपटामध्ये शूटिंग झालं. आज चित्रपट पूर्ण झाला आहे. २५ एप्रिलला तो रिलीज होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन सुरू झालं आहे, माझ्या आयुष्यातला हा पहिलाच चित्रपट ज्याची रिलीज डेट आधीच ठरली होती. तीन महिन्याच्या आत हा चित्रपट पूर्ण होऊन प्रेक्षकांसमोर येतो आहे. केदार यांचा हात शूटिंग दरम्यान फ्रॅक्चर झाला. तरीसुद्धा शूटिंगला ब्रेक न देता ठरल्याप्रमाणे त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्यांच्या शारीरिक वेदना जाणवत होत्या. पण मी शब्द दिला आहे, मग माझा हात मोडला तरी तो शब्द मी पाळणार. वेदना सहन करत एक सुंदर मराठी एंटरटेनमेंटींग चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत आणि हा चित्रपट खूप चालेल अशी माझी खात्री आहे,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून, या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं.