Milind Gawali shares special post: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असतात. आता मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत गणपती विर्सजनाच्या दिवशी सर्वांना काळजी घेण्याचे, सभ्यपणे मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“सामान्य लोकांची गैरसोय न करता…”

मिलिंद गवळींनी लिहिले, “आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस हा एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेला सण आहे. जो महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. आजचा हा सण भक्ती, श्रद्धा, संकटातून मुक्ती व समृद्धीचं प्रतीक असलेला सण आहे.”

“महाभारतात युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हे व्रत केल्याने त्याचे दु:ख दूर झाले, अशी मान्यता आहे. गणपती बाप्पा बुद्धीची, ज्ञानाची देवता आहे. या ११ दिवसांमध्ये त्याच्याकडे चांगली बुद्धी, शहाणपण मागितलं असेल, तर पुढचा आपल्या आयुष्याचा प्रवास चांगला, सोपा होईल. तसा गणपती बाप्पा ही फक्त बुद्धीची नाही, तर शौर्याचीही देवता आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.

सणांच्या महत्त्वाबाबत गवळी म्हणाले, “शुभकार्याची सुरुवात त्याच्या आराधनेपासून होते, तो आपल्याला यश मिळवून देण्यासाठी मदत करतो. पण, प्रयत्न आणि प्रार्थना आपल्यालाच कराव्या लागतात. मग आपल्या वाटेत येणारे विघ्न, अडथळे तो विघ्नहर्ता दूर करतो. आपल्याकडचे सगळे सण खूप महत्त्वाचे आहेत. आता गणपती आणि गौरी विसर्जनानंतर नवरात्री, दसरा, कोजागिरी पौर्णिमा व दिवाळी एकामागे एक येणार आहेत. आपली संस्कृती आणि परंपरा इतकी रंगीबेरंगी आहे.”

“प्रत्येक सणाचं खूप महत्त्व आहे. बऱ्याच जणांना सण म्हणजे सुट्टी. सण म्हणजे मजा-मस्ती. पण, मला असं वाटतं की, सण म्हणजे फक्त मजा-मस्ती किंवा सुट्टी नसून, सण म्हणजे एक नवीन ऊर्जा असते. भूतकाळातील नकारात्मकता, घडून गेलेल्या अप्रिय गोष्टी, आपल्याकडून झालेल्या असंख्य चुका, या सगळ्या पुसून, नव्याने आयुष्य जगण्याची आशा, पुन्हा प्रयत्न करून यश मिळवायचे स्वप्न, ईश्वराची आराधना आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडण्याकरिता प्रार्थना असते,” असेही त्यांनी सांगितले.

सण आणि स्वास्थ्याचा संबंध विशद करून सांगताना ते म्हणाले, “हे सण लोकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारतात, उत्साह वाढवतात आणि जीवनात ऊर्जा भरण्यास मदत करतात. सणांमुळे लोक देवांची पूजा, आराधना करतात. ज्यामुळे आपली धार्मिक, श्रद्धा, आध्यात्मिक उन्नती होते. सणांच्या निमित्ताने कुटुंबं, शेजारी आणि समाज एकत्र येतो आणि आनंद साजरा करतो.”

“आज गणपती बाप्पाला खूप प्रेमाने, आनंदाने, वाजत-गाजत, नाचत, निरोप देऊया. पण, खूप सभ्यपणे, मद्यपान धूम्रपान न करता, दंगा-मस्ती न करता, आया-बहिणींची चेष्टामस्करी न करता, पोलिसांना सहकार्य करीत, सामान्य लोकांची गैरसोय न करता, मिरवणुकीत येणाऱ्या लहान लेकरांची काळजी घेत, छानपैकी आपल्या गणपती बाप्पाला निरोप देऊया. आपल्या या इतक्या सुंदर सणाचं पावित्र्य राखूया. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”, असे आवाहन करीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली.

दरम्यान, मिलिंद गवळी सध्या ‘मनपसंद की शादी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.