अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ते अनिरुद्ध ही भूमिका साकारत होते. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या निमित्ताने विविध मुलाखती व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेते त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसले होते. आता मात्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मिलिंद गवळी यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाले मिलिंद गवळी?

मिलिंद गवळी यांनी वडिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच त्यांनी काही फोटोदेखील शेअर केले आहेत. मिलिंद गवळी लिहितात, “पप्पा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही ८५ वर्ष पूर्ण केले. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू देत आणि तुमच्या आवडत्या समाजकार्यासाठी तुम्हाला अजून खूप ऊर्जा, शक्ती आणि यश मिळू देत. मला माहिती आहे, तुम्हाला यश मिळो वा न मिळो, तुमचं कार्य सतत प्रामाणिकपणे चालू असतं.”

मिलिंद गवळी इन्स्टाग्राम

“सतत कामात व्यस्त राहणे, सतत दुसऱ्याला मदत करत राहणे, पोलिस खात्यातून रिटायर झाल्यानंतर तुम्ही री-टायरिंग (Re-tyreing) करून घेतलं. गाडीला जसे नवीन टायर लावून परत ती वेगाने धावायला लागते, तसेच इतकी वर्ष पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा तुम्ही दुप्पटीने काम केलं आहे. असंख्य लोकांना मदत केली आहे, अनेक कुटुंबांचे कल्याण केलं आहे, समाजातल्या तळागाळातल्या कोणीही तुमच्याकडे मदतीचा हात मागितला आणि तो निराश होऊन परत गेला असं कधी झालं नाही.”

“पोलिस खात्यातले अधिकारी खूप गर्विष्ठ आणि अहंकारी पाहिलेले आहेत, पण तुम्ही सहाय्यक पोलिस आयुक्ताच्या पदावर असतानासुद्धा कधीही गर्व केला नाही किंवा हाताखालच्या लोकांवर अधिकार गाजवला नाहीत, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर राहून इतरांना आपण कशी मदत करता येईल हेच सातत्याने बघत आलात; त्यामुळे निवृत्त झाल्यानंतरसुद्धा इतक्या वर्षांनी आजही लोक तुम्हाला मान देतात, आजही लोकांचा तुमच्यावर जीव आहे, मला असंख्य लोकं भेटतात आणि तुमच्याविषयी अतिशय प्रेमाने आणि आदराने बोलतात, तेव्हा माझी प्रेमाने छाती भरून येते, मी किती भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे वडील लाभले.”

“माझ्या आयुष्याची ही वाटचाल तुमच्या आधाराशिवाय होऊ शकली नसती. तुम्ही कायम माझे हिरो राहिला आहात. तुमच्या इतकं काम मी आयुष्यात करू शकणार नाही हे मला लहानपणीच कळलं होतं. पण, आजही तुमच्यामुळे खूप काम करायची ऊर्जा सतत मिळत असते. तुमच्यामुळे आजही प्रामाणिक काम करायचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला आनंद मिळावा आणि तुम्हाला माझा अभिमान वाटावा म्हणून माझी सतत धडपड चालू असते. माझे वडील वर्कहोलिक आहेत, असं मी सतत सगळ्यांना सांगत असतो. पण, आज तुमच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्की करा, पण या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःची काळजीसुद्धा घ्या, स्वतःच्या तब्येतीला जपा, पप्पा कधीतरी स्वतःसाठीपण जगा, आय लव्ह यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असतात. अनेकदा चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगताना दिसतात. आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.