Milind Gawali Talks About Television Actor’s Struggle : मिलिंद गवळी मराठीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. लवकरच ते एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी टेलीव्हिजन क्षेत्राबद्दल वक्तव्य करीत काही धक्कादायक प्रसंग सांगितले आहेत.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते त्यामार्फत त्यांच्या प्रतिक्रिया, मते व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी टेलीव्हिजन क्षेत्राबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काही अनुभव सांगत धक्कादायक खुलासे केले आहेत.
मिलिंद गवळी यांचं टेलीव्हिजन क्षेत्रातील कामाच्या पद्धतींबद्दल वक्तव्य
मिलिंद गवळी मुलाखतीमध्ये म्हणाले, “काही लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. त्यांनी या क्षेत्रात येऊच नये कारण- हे साधं, सोपं, सरळ क्षेत्र नाहीये. ९ ते ५ नोकरी करा. तिथे ५ च्या ठोक्याला लोक निघतात इथे तसं नाहीये. इथे सीन संपला नाही, तर रात्री २, ३, ४ पर्यंत काम करावं लागतं. बऱ्याचदा असं होतं. एकदा तर कॅमेरामन म्हणाला होता. आता सूर्य वर आलाय, रात्र गेली. आता मी शूट नाही करू शकत. म्हणून शूटिंग थांबवावं लागलं. नाही तर ते चालूच राहतं.”
मिलिंद गवळी पुढे म्हणाले, “अनेक कलाकार सेटवर बेशुद्ध पडतात. मालिकांच्या सेटवर तर नायिका बेशुद्ध पडतातच. कारण- जर ती मुख्य नायिका असेल, तर तिला खूप काम करावं लागतं. सर्वाधिक संवाद, सीन तिचे असतात. तुम्ही जर ते नीट केले नाहीत, तर १०० टक्के तुम्ही आजारी पडणार. तुमच्या आरोग्याच्या समस्या सुरू होणार.”
मिलिंद गवळी याबाबत पुढे म्हणाले, “आरोग्याच्या समस्या निदान डॉक्टरांना कळतात. पण, गेल्या सात वर्षांपासून मालिकांमध्ये काम करीत असल्यानं माझ्या असं निदर्शनास आलंय की, टेलीव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मानसिक त्रास होणार. कारण- तुम्ही सातत्यानं ती भूमिका करीत असता, जी तुमच्यापेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे हे खूप वेगळं क्षेत्र आहे.”
दरम्यान, मिलिंद गवळी लवकरच ‘मनपसंद की शादी’ या मालिकेतून झळकणार आहेत. त्यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री सुचित्रा बांदेकरही पाहायला मिळणार आहेत. तसेच त्यामध्ये त्यांच्यासह इतर काही मराठी कलाकारांचीही वर्णी लागली आहे. ११ ऑगस्टपासून ही मालिका सुरू होणार आहे.