Mrunal Dusanis Shared Memory Of Late Actress Priya Marathe : प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. काही दिवसांपूर्वीच प्रियाचं दुर्दैवी निधन झालं. प्रियाच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हळहळ व्यक्त केली. अशातच आता अभिनेत्री मृणाल दुसानिसही प्रियाच्या आठवणी सांगत भावुक झाली आहे.

मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रिया मराठे व शंतनू मोघे यांच्याबद्दल सांगितलं आहे. ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत प्रियाबद्दल मृणाल म्हणाली, “प्रियाबद्दल काहीच बोलवत नाही, मोबाईलसुद्धा उघडण्याची इच्छा होत नाही.कारण तिच्याबरोबर वेळ घालवलेल्या प्रत्येकाला काय त्रास होत असेल ते सांगणं अवघड आहे.”

प्रिया मराठेबद्दल मृणाल दुसानिसची प्रतिक्रिया

मृणाल प्रियाच्या कुटुंबाबद्दल म्हणाली, “आमच्याहीपेक्षा तिचं कुटुंब, शंतनू, तिची आई, भाऊ यांच्यासाठी आयुष्यातील खूप कठीण प्रसंग आहे हा. आम्हाला आताही शंतनूला भेटायची हिंमतच होत नाहीये. आम्ही विचार करतोय त्याला भेटण्याचा, पण तिच्या घरी जाऊन शंतनूला भेटण्याची हिंमतच होत नाहीये. दोन-तीन दिवस झाले रिकामं बसलो की प्रियाशिवाय दुसरं काही डोक्यात येतच नाही.”

मृणाल दुसानिसा पुढे प्रियाबद्दल म्हणाली, “आम्ही फोनवर एकमेकींशी बोलायचो. मेसेजवरही बोलायचो. शंतनूच्या व तिच्या संपर्कात होतो. काही गोष्टी आपल्या हातातच नसतात. कसं तिला यातून बाहेर काढायचं याबद्दल आम्हाला पण काही कळत नव्हतं, हे सगळं वाईट आहे.”

मृणाल दुसानिसने सांगितली प्रिया मराठेची ‘ती’ आठवण

मृणाल पुढे म्हणाली, “मी अमेरिकेत असतानासुद्धा तिचा मला फोन आलेला की मी इथे आले आहे, तू मला भेट; पण काही कारणामुळे आमची चुकामूक झाली आणि आमची भेटच झाली नाही. अगदी आयत्यावेळी असं झालं की, प्रियाचा फोन बंद झाला की काय, कुठे भेटायचं याबद्दल काही नीट ठरलं नाही. ती अमेरिकेतून निघून गेली आणि मी तिला फोनच करत राहिले. तिचा फोनच लागला नाही. मग ती जेव्हा भारतात परतली तेव्हा ती माझ्यावर खूप चिडलेली. मी तिला म्हटलं, अगं माहीतच नाही मी तुला कुठे भेटायला यायचंय, त्यामुळे आमचं तेव्हापसूनच भेटणं राहिलेलं; तेव्हापासून आम्ही भेटलोच नाही.”

“प्रियाबरोबर माझं शेवटचं बोलणं २० की २५ जुलैला झालेलं. त्यानंतर मी मग शंतनूशी बोलले होते. तेव्हा तोही मला म्हणालेला की, एक-दोन आठवड्यात ती बरी होईल. आता आयुर्वेदिक ट्रिटमेंट आम्ही सुरू करतोय, त्यामुळे सगळं नीट होईल अशी प्रार्थना करूयात, असं माझं त्याच्याशी बोलणं झालेलं.”