मराठीतील लोकप्रिय गायकांमध्ये प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायनचा समावेश होतो. आपल्या गोड आवाजाने दोघांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’मधून प्रथमेश व मुग्धा घराघरांत पोहचले. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली. कोकणात या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
दरम्यान, मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त मुग्धाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोघांचे लग्नातील अनसिन फोटो बघायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी विवाहसोहळा पार पडला, त्या हॉलच्या दृष्यापासून व्हिडीओची सुरुवात होते. लग्नातील सप्तपदी तसेच मुग्धा व प्रथमेश एकमेकांना हार घालत असल्याचेही बघायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओमधील मुग्धा व प्रथमेशच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा व्हिडीओ शेअर करत मुग्धाने “सर्वात शुद्ध व अनंतकाळापर्यंत कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला एक महिना पूर्ण झाला आहे”, अशी कॅपशनही दिली आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘डंकी’ या चित्रपटातील ‘ओ माही’ हे रोमॅंटिक गाणे लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर मुग्धाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंटचा पाऊस पाडला आहे.
गेल्यावर्षी मुग्धा व प्रथमेशने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांच्या ग्रहमखपासून हळदीपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नातील दोघांच्या साध्या लूकचे सगळीकडे कौतुक झाले होते.