Mukesh Khanna reacts on Pankaj Dheer Death : ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांचे बुधवारी (१५ ऑक्टोबर रोजी) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार व चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. पंकज यांचे सहकलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान, ‘महाभारत’मधील त्यांचे सहकलाकार मुकेश खन्ना यांनीही पंकज यांच्या आठवणी सांगितल्या.
बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत मुकेश खन्ना यांनी भीष्म पितामहची भूमिका साकारली होती. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला, त्यात पंकज धीर यांच्याबरोबरच्या ‘महाभारत’च्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. पंकज यांचं निधन अचानक झालं. वर्षभरापूर्वी पंकज यांना आपण पॉडकास्ट करायला बोलावलं होतं. पंकज जुन्या दिवसांबद्दल किंवा महाभारताबद्दल बोलण्यास तयार नव्हते, पण नंतर मुकेश यांनी मनधरणी केल्याने ते तयार झाले.
मुकेश खन्ना यांना साकारायची होती कर्ण नाहीतर अर्जुनची भूमिका
मुकेश यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा पंकज यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क साधला होता, तेव्हा पंकज यांनी नकार दिला. पंकज आजारी आहेत हे तेव्हाच मुकेश यांना समजलं. मुकेश खन्ना यांना सुरुवातीला ‘कर्ण’ किंवा ‘अर्जुन’ची भूमिका करायची होती, पण त्यांना ‘भीष्म पितामह’ची भूमिका मिळाली. “देवाने मला भीष्मची भूमिका दिली आणि मग पंकज माझ्यासमोर कर्णाच्या भूमिकेत आले,” असं खन्ना म्हणाले.
“पंकज धीर यांनी माझा पहिला चित्रपट ‘रूही’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना महिन्याला फक्त ३०० रुपये मिळत होते. ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचे. ते खूप मेहनत करायचे. त्यांची बोलण्याची पद्धत खूपच वेगळी आणि स्टायलिश होती. नंतर आम्ही ‘सौगंध’ आणि ‘पांडव’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ते मला ‘एमके’ म्हणायचे. त्यांना चांगले पदार्थ खायला आवडायचं. ते खूप चांगले कपडे घालायचे,” असं मुकेश खन्ना म्हणाले.

महाभारतमधील कलाकारांचे निधन
पंकज धीर यांचे वडील चित्रपटसृष्टीत काम करायचे, पण तरी पंकज यांनी खूप संघर्ष करून स्वबळावर यश मिळवले; असं मुकेश यांनी नमूद केलं. “अलिकडच्या काळात, आपल्या ‘महाभारत’मधील अनेक कलाकार गूफी पेंटल (शकुनी) आणि प्रवीण कुमार (भीम) यांचे निधन झाले आहे आणि आता पंकज धीरही यांचेही निधन झाले,” असं मुकेश खन्ना म्हणाले.
पंकज धीर यांनी वाचले नव्हते महाभारत
मुकेश खन्ना यांनी पंकज धीरबद्दल एक रंजक गोष्ट सांगितली. “पंकज यांनी ‘महाभारत’ कधीच वाचले नव्हते. त्यांनी फक्त ‘मृत्युंजय’ नावाचे पुस्तक वाचले होते, जे कर्णाच्या दृष्टिकोनातून लिहिले गेले होते. यामुळे, त्यांना अनेकदा असं वाटायचं की ‘महाभारत’ मध्ये त्या पुस्तकात वाचलेली अनेक दृश्ये घेतलेली नाहीत,” असं मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे मुकेश हसत म्हणाले, “मी त्यांना गमतीने ‘कॉन्व्हेंट पांडव’ म्हणायचो, कारण त्यांनी मूळ ‘महाभारत’ वाचले नव्हते. पण त्यांचा अभिनय इतका उत्कृष्ट होता की आजही सर्वजण ‘कर्ण’ म्हणून त्यांची आठवण काढतात.”