स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’ चा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकीने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ‘बिग बॉस १७’ ची ट्रॉफी जिंकली. तर अभिषेक कुमार या पर्वाचा उपविजेता ठरला. या घरातील मुनव्वरचा प्रवास त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप गाजला. आयशा खानने घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आणि मुनव्वरवर खूप गंभीर आरोप केले होते. आता शो जिंकल्यानंतर मुनव्वरने आयशाबद्दल भाष्य केलं आहे.
‘इन्स्टंट बॉलीवूड’ ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वरला विचारण्यात आलं की शो संपल्यानंतर तो आयशाच्या संपर्कात राहिल का? यावर मुनव्वर म्हणाला, “मला वाटत नाही की मी तिच्या संपर्कात राहीन. मी खूप गोष्टी सोडून देतो, पण कधी कधी काही गोष्टी योग्य रितीने संपवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच गोष्टी मी बिग बॉसच्या प्रवासातून शिकलो आहे. यापुढे नात्यांमध्ये जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात त्याच लोकांना महत्त्व द्या, ज्यांच्या आयुष्यात तुम्हाला महत्त्व आहे, हेच मी शिकलोय आणि त्यावर काम करेन.”
Bigg Boss 17 ची ट्रॉफी जिंकल्यावर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट, डोंगरीचा उल्लेख करत म्हणाला…
दरम्यान, आयशा खानने ‘बिग बॉस १७’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर तिने मुनव्वर फारुकीवर आरोप केले होते. मुनव्वर दुसऱ्या मुलीबरोबर नात्यात होता, पण तरीही त्याने आपली फसवणूक केली असं तिने म्हटलं होतं. मुनव्वर खोटं बोलला आणि त्याने खूप मुलींची फसवणूक केली आहे, असंही ती म्हणाली होती. या प्रकरणानंतर मुनव्वर मानसिकदृष्ट्या खचला होता. त्याने शोमध्ये बऱ्याचदा आयशाची माफीही मागितली होती.