‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील अनेक भूमिका बदलल्या; मात्र तरीही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.
या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. वयाच्या ३७ व्या वर्षीही मुनमुन अविवाहित व सिंगल आहे. मुनमुन दत्ता अजूनही या शोशी जोडलेली आहे. तिच्या सौंदर्य आणि तिच्या स्टाईलमुळे प्रत्येक जण प्रभावित होतो. हे स्थान मिळविण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. तिनं तिच्या आईबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. तसेच, ती आर्थिक अडचणींबद्दलही बोलली आहे.
आईबरोबरच्या नात्याबद्दल ‘ई टाइम्स’शी बोलताना मुनमुन दत्ता म्हणाली, “एक शब्दही पुरेसा नाही. हे एका रोलर कोस्टरसारखं आहे. आमच्यात प्रेम आहे. आम्ही भांडण करतो. आमच्यात मैत्री आहे. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तिच्याशी बोलू शकते. माझ्या आईचं लग्न खूप लहान वयात झालं आणि तिनं तिचं संपूर्ण आयुष्य आम्हाला वाढवण्यात आणि कुटुंबाची काळजी घेण्यात घालवलं”.
मुनमुन दत्ता म्हणाली की, तिच्या आईनं तिला नेहमीच जीवन जगण्यासाठी प्रेरित केलं. “तिनं माझ्यावर लग्न करण्यासाठी कधीही दबाव टाकला नाही. खरं तर ती मला नेहमीच माझ्या करिअर, ट्रिप व माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला सांगते”. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिच्या गावी लोक तिच्या लग्नाबद्दल विचारतात तेव्हा तिची आई तिच्या बाजूनं बोलते. मुनमुन म्हणाली, “माझी आई त्यांना अभिमानानं सांगते की, मला आता लग्न करायचं नाही. आणि ती मला पूर्णपणे साथ देते”.
मुनमुन दत्ताकडे पैसे नव्हते…
मुनमुन दत्ताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं की, तिला आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला. “मला घराचं भाडं देण्यासाठी आणि फोटोग्राफरला माझ्या पोर्टफोलिओचे पैसे देण्यासाठी पैशांची गरज होती.” माझ्या आईनं वडिलांना न सांगता तिनं साठवून ठेवलेले पैसे मला दिले. त्या पैशांमुळे मला भाडं भरण्यास आणि माझं फोटोशूट व ऑडिशन्स करण्यास मदत झाली. त्या एका आधारानं मला खूप काही दिलं.
मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये दिसली आहे. ती या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारत आहे. बबिताच्या अभिनयाचं तिच्या चाहत्यांना कौतुक वाटतं.