Shashank Ketkar on OnScreen Daughter Name: ‘मुरांबा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी आहे. या मालिकेतील रमा अक्षय ही पात्रे चाहत्यांची लाडकी आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

काही दिवसांपूर्वी मालिकेत सात वर्षांचा लीप आल्याचे पाहायला मिळाले. सात वर्षांनंतर मालिकेत अनेक बदल झाल्याचे दिसले. रमा आणि अक्षय एकमेकांपासून दूर झाले, त्यांची मुलगी आरोही सात वर्षांची झाली आहे. रमा दूर असली तरीही तिला तिच्या मुलीविषयी आणि अक्षयविषयी आजही काळजी वाटते, प्रेम वाटते, त्यांची आठवण येते. अक्षयच्या मनात मात्र रमाविषयी राग आहे; तर आरोहीच्या मनात तिच्या आईविषयी अनेक प्रश्न असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

मालिकेत रमाच्या भूमिकेत शिवानी मुंढेकर दिसत आहे. अक्षयच्या भूमिकेत अभिनेता शशांक केतकर दिसत आहे, तर आरोहीच्या भूमिकेत बालकलाकार आरंभी उबाळे दिसत आहे.

शशांक केतकर काय म्हणाला?

आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शशांक केतकरने सांगितले की, सुरुवातीला त्याच्या ऑनस्क्रीन मुलीचे नाव राधा ठेवले होते, पण विनंती करून ते बदलण्यास सांगितले, कारण त्याच्या खऱ्या मुलीचे नावसुद्धा राधा आहे.

अभिनेता म्हणाला, “जेव्हा मालिकेत मुलीच्या कास्टिंगबाबत गोष्टी चालल्या होत्या, जेव्हा मी पुढचा स्क्रीन प्ले वाचला, तेव्हा पहिल्यांदा मुलीचं नाव राधा असं ठरलं होतं. पण, मी चॅनेलला विनंती केली की राधा हे नाव ठेऊ नका, कारण माझ्या मुलीचं नाव राधा आहे, त्यामुळे मालिका पाहिल्यानंतर माझ्या मुलाला ऋग्वेदला हे सगळं खरं वाटू शकतं. तिकडे राधा आहे, तर त्या राधाशी बाबा असं का वागतोय? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतील, जे लहान मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतात. तर ऋग्वेद, राधा यातील कोणतं नाव ठेऊ नका. चॅनेलने ते ऐकलं आणि आता माझ्या ऑनस्क्रीन मुलीचं नाव आरोही असं आहे.”

जेव्हा शशांक केतकर मालिकेत लहान मुलांबरोबर काम करत असतो, त्यावेळी त्याच्या मुलाची ऋग्वेदची त्यावर काय प्रतिक्रिया असते? यावर अभिनेता म्हणाला, “माझ्या ऑनस्क्रीन मुलीला पाहून तो म्हणतो की, बाबा तू तिच्याशी कट्टी घे, तू तिच्याशी फार बोलू नको. मी जेव्हा सेटवर येईन तेव्हा त्या मुलीला सांगेन की तो बाबा माझा आहे. मग मी त्याला आणि आरंभीलासुद्धा समजावतो की हे सगळं खोटं असतं. खरं नसतं. पण, लहान मुलांचं मन इतकं निर्मळ असतं की त्यांना सगळं खरं वाटतं. ऋग्वेद आता पाच वर्षांचा आहे, तर आरंभी दुसरीला आहे.”

शशांकने याच मुलाखतीत असेही सांगितले की, मी किंवा पत्नी प्रियांका जे काम करत असेल ते ऋग्वेदला करायचं असतं. दरम्यान, अभिनेता अभिनयाबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेचा विषय ठरतात.