Muramba Serial Promo : ‘मुरांबा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. अभिनेत्री शिवानी मुंढेकर व शशांक केतकर यामधून मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेने काही दिवसांपूर्वी सात वर्षांचा लीप घेतलेला, ज्यानंतर रमा व अक्षय एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचं दिसलं. तर आता त्यांची मुलगी सात वर्षांची झाली असून, ती तिच्या आई-वडिलांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करीत असते.

‘मुरांबा’ मालिकेत लीपनंतर रमा-अक्षय त्यांची लेक आरोहीच्या निमित्ताने एकमेकांना पुन्हा भेटतात, असं पाहायला मिळालं. सात वर्षांनंतर एकमेकांना भेटल्यानंतरही दोघांच्याही मनात एकमेकांविषयी गैरसमज असून, त्यामुळे त्यांच्यातील अंतर संपलेलं नसतं. परंतु, आता त्यांची लेक त्यांना एकमेकांच्या जवळ घेऊन येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळतं.

आरोहीमुळे रमा-अक्षयमधील दुरावा संपणार?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवर मालिकेचा प्रोमो शेअर केला असून, त्यामध्ये दसऱ्यानिमित्त आरोही त्यांच्यातील दुरावा संपवण्याचा प्रयत्न करताना दिसली. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आरोही “यंदाच्या दसऱ्यानिमित्त मी आई-बाबांना एकत्र आणणारच. कारण- दसरा म्हणजे प्रेमाचा विजय,” असं म्हणाताना दिसते. आरोही पुढे रमा व अक्षयला, “तुम्ही दोघं एकमेकांना आपट्याची पानं द्या ना,” असं म्हणते. त्यानंतर लेकीच्या आग्रहाखातर रमा व अक्षय एकमेकांना आपट्याची पानं देतात आणि एकमेकांना शुभ दसरा, अशा शुभेच्छाही देतात. परंतु, अक्षयच्या मनात मात्र अजूनही रमाबद्दल राग असल्याचंच दिसतं.

रमा व अक्षय यांनी एकमेकांना दिलेल्या पानांवर त्यांची नावं लिहिलेली पाहायला मिळतात. त्यानंतर आरोही पुढे “तुम्ही एकमेकांना सोन्यासारखं जपायला हवं. कारण- तुम्ही दोघे माझ्यासाठी सोनं आहात”, असं म्हणताना दिसते. त्यामुळे आता दसऱ्यानिमित्त रमा व अक्षयच्या प्रेमाचा विजय होणार का? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल.

आरोही दुरावलेल्या तिच्या आई-बाबांना एकत्र आणू शकेल का? आणि रमा व अक्षयमधील दुरावा कायमचा मिटेल का? पुन्हा त्यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण होईल का? हे पाहणं रंजक ठरेल.