Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत पोहोचले, त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. विशेष म्हणजे हास्यजत्रेत काम करणाऱ्या कलाकारांचं एकमेकांशी फारच सुंदर बॉण्डिंग आहे.
अलीकडेच हे सगळे कलाकार पावसाळी ट्रिपला गेले होते. यावेळी या सगळ्यांनी मिळून धमाल केल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यांचा डान्स व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. आता नुकताच अभिनेत्री नम्रता संभेरावने हास्यजत्रेच्या सेटवरचा आणखी एक Inside व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये हास्यजत्रेच्या सेटवर जे कलाकार उशिरा येतात त्यांना कोणती शिक्षा देण्यात येते, याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
नम्रताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर पाणीपुरी खाण्यासाठी आतुर झाल्याचं पाहायला मिळतंय. यामागे एक विशेष कारण आहे. ते म्हणजे, सेटवर जे लोक उशिरा पोहोचतात त्यांना दंड भरावा लागतो आणि त्यानंतर सगळे मिळून एकत्र पाणीपुरी पार्टी करतात. यावेळी प्रियदर्शिनी इंदलकर, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, ओंकार राऊत यांना उशीर झाल्यामुळे त्यांनी भरलेल्या दंडाची आम्ही पार्टी करतोय असं वनिता खरात आणि प्रसाद खांडेकर या व्हिडीओमध्ये सांगत आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर उशिरा गेल्यावर काय होतं?
नम्रता संभेराव हा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “आमच्या मनोरंजन फंडातील पाणीपुरी…आम्हाला उशीर झाल्यावर, आम्ही सगळे नियमानुसार दंड भरतो आणि त्यानंतर आम्हीच पाणीपुरीची एकत्र पार्टी करतो. आम्ही सगळ्यांनी या शिक्षेला मनोरंजन दंड असं नाव ठेवलंय.”
नम्रता संभेरावने शेअर केलेले हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेच्या कलाकारांमधल्या सुंदर बॉण्डिंगने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, हास्यजत्रेतील कलाकारांच्या बॉण्डिंगचा आणखी एक किस्सा सांगायचा झाला, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नम्रता संभेरावला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी सुद्धा हास्यजत्रेच्या सगळ्या कलाकारांनी नम्रताचं पोस्ट शेअर करून अभिनंदन केलं होतं. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर यांनी देखील नम्रताला भरभरून प्रोत्साहन दिलं होतं.