Bhumija Patil Talks About Her Wedding : भूमिजा पाटील मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे. अशातच अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिचं लग्न मोडल्याचं म्हटलं आहे.

भूमिजा पाटीलने भाऊबीजेनिमित्त नुकत्याच बहिणीबरोबर दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. भूमिजाला दोन बहिणी असून या मुलाखतीत तिच्याबरोबर तिची मोठी बहीण उपस्थित होती. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना ती म्हणाली, “सगळ्यांनाच माहितीये की माझा साखरपुडा झालेला आहे आणि लग्न होणार होतं. काहींना तर माझं लग्न झालंय असंही वाटतं, पण तसं नाहीये. दुर्दैवाने काही कारणामुळे आम्ही वेगळे झालो आहोत.”

भूमिजा पाटीलची लग्न मोडल्याबद्दल प्रतिक्रिया

भूमिजा पाटील पुढे म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय होता ज्याची मला खूप भीती वाटत होती. आपण तेव्हा विचार करत असतो की आता लोक काय म्हणतील. पण, मला तेव्हा असं वाटत होतं की मला त्रास होतोय, मी काहीतरी चुकीचा निर्णय घेतलाय. तेव्हा मी फक्त हे माझ्या बहिणींना बोलले, तेव्हा त्यांनी तुला यामुळे त्रास नाही ना होणार, तू ठाम आहेस का? तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. जर तुला त्रास होणार असेल तर तो आम्हाला बघवणार नाही, त्यामुळे तू घे निर्णय असं म्हणाल्या. खरं तर माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा निर्णय होता, खूप वाईट प्रसंग होता तो.”

भूमिजा पुढे तिच्या बहिणींचं कौतुक करत म्हणाली, “त्यांनी मी चुकीची आहे की बरोबर हे पाहिलंच नाही. त्यांनी फक्त तू सुखी आहेस ना हेच विचारलं होतं, त्या नेहमी माझ्याबरोबर असतात.”

भूमिजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत झळकलेली. यामध्ये तिने सरस्वती ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. यासह तिने ‘फुलाला सुंगंध मातीचा’, ‘माझी माणसं’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती ‘७ बेलवलकर’ या नाटकात काम करत आहे.