Actress Sharmila Shinde First Home : मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री गेली अनेक वर्षे आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून होती. अखेर अभिनेत्रीचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे.
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवारी लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला शिंदेने नुकतंच मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे शर्मिला प्रसिद्धीझोतात आली होती. यामध्ये तिने साकारलेलं खलनायिका रुपालीचं पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं होतं, यानंतर शर्मिलाने बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. मात्र, अलीकडेच ती ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लीलाच्या सासूची म्हणजेच दुर्गाची भूमिका साकारताना दिसली.
मालिका संपल्यावर अवघ्या महिन्याभरातच शर्मिलाने तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इतके वर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या या अभिनेत्रीने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलेलं आहे. शर्मिला म्हणते, “अखेर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मी या शहराला माझं ‘घर’ म्हणू शकते.” इतकी वर्षे भाड्याने राहत असलेलं घर सोडताना शर्मिलाला अश्रू अनावर झाले होते. यासाठी तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शर्मिला शिंदेने घेतलं स्वत:चं पहिलं नवीन घर
“भाड्याचं असलं तरी घर होतं… अख्खं घर स्वत:च्या हाताने स्वच्छ करून किल्ल्या घर मालकाला सुपूर्द केल्या. या घराने मला खूप काही दिलं आणि प्रत्येक चांगल्या- वाईट प्रसंगात मला साथ दिली. म्हणूनच घर सोडताना अश्रू अनावर झाले… हुंदके देत रडले. एखाद्या हाडामांसाच्या माणसाला सोडून दूर जातेय असा त्रास झाला. वन लास्ट टाइम… माझ्या भाड्याच्या घरातून दिसणारी सगळी दृश्य डोळ्यात साठवली. आता तो नजारा पुन्हा पाहता येणार नाही. या वास्तूचे मस्तक टेकवून आभार…जुनं घर सोडताना इतका त्रास झाला की, माझी गाडी पार्किंगमधून निघत नव्हती. पण, आज त्याच वास्तूने मला स्वत:चं नवीन घर दिलंय. नव्या घराचा सुद्धा तेवढाच आनंद आहे. माझं स्वत:चं पहिलं घर…तुमच्या आणि मी आजपर्यंत भाड्याने राहिलेल्या प्रत्येक वास्तूने दिलेला आशीर्वाद म्हणजे हे माझं पहिलं घर…” असं शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शर्मिलाच्या व्हिडीओवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कमेंट्स करत “अशीच प्रगती करून आयुष्यात खूप पुढे जा” अशा शुभेच्छा तिला दिल्या आहेत. अद्वैत दादरकर, कुशल बद्रिके, रेश्मा शिंदे, अक्षय केळकर, सीमा घोगळे या कलाकारांनी कमेंट्स करत शर्मिलाचं नव्या घरासाठी अभिनंदन केलं आहे.