Marathi Actress Dance Video : गाण्यांच्या भेंड्या असो किंवा शाळेचं स्नेहसंमेलन प्रत्येक समारंभात ‘राधा ही बावरी’ हे गाणं आजही तेवढ्याच आवडीने गायलं जातं. ‘तू माझा किनारा’ या अल्बममधल्या या गाण्याला प्रदर्शित होऊन आज जवळपास २० वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, तरीही या गाण्याची जादू संगीतप्रेमींच्या मनावर आजही कायम आहे. ‘राधा ही बावरी’ या गाण्याचे गीतकार अशोक पत्की आहेत तर, हे गाणं लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकरने गायलं आहे.
‘ओल्ड इज गोल्ड’ म्हणतात अगदी त्याचप्रमाणे ‘राधा ही बावरी’ हे गाणं इन्स्टाग्रामवर कायम ट्रेंडिंग असतं. नुकताच दोन लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी या गाण्यावर सुंदर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मराठी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या दोघींनी ‘राधा ही बावरी’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं आहे. या दोघीही उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
वल्लरीने शेअर केलेल्या ‘राधा ही बावरी’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. विशेषत: वल्लरी आणि आलापिनी यांच्या सुंदर एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“Ufff किती सुंदर व्हिडीओ आहे”, “हे नाइट शूट तुम्ही खूपच भारी केलंय”, “डान्स सुंदर आहेच…पण किती सुंदर रोषणाई केलीये”, “याठिकाणी अजून एक डान्स शूट करा”, “या दोन्ही राधा तर खूपच सुंदर आहेत”, “किती गं ते सुंदर…अप्रतिम वल्लरी खूपच गोड व्हिडीओ आलाय”, “अतिसुंदर मैत्रीण असावी तर अशी! किती गोड व्हिडीओ आहे” अशा असंख्य प्रतिक्रिया या दोघींच्या डान्स व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, वल्लरी व आलापिनी यांना ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. आता मालिका संपल्यावर वल्लरी आणि आलापिनी यांची जोडी रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
