Marathi Actress : शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाल्यावर कलाकार मनसोक्तपणे आपलं आयुष्य जगतात. विशेषत: एखादी मालिका संपल्यावर कलाकारांकडे खूप मोकळा वेळ असतो. कारण, मालिकांचं शूटिंग साधारणत: १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे एखाद्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर काही कलाकार एन्जॉय करायला विविध ठिकाणी ट्रेकला गेल्याचं पाहायला मिळालं. तर, काहींनी कुटुंबीयांसह परदेशवारी केली.
एखादी कलाकृती जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेते, तेव्हा निश्चितच त्यामधील कलाकारांना वाईट वाटतं. मात्र, पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्याआधी अनेक कलाकार काही दिवस ब्रेक घेतात आणि स्वत:ला वेळ देत आयुष्य जगतात. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज प्रमुख भूमिका साकारत होती. तिने साकारलेल्या पात्राचं नाव ‘लीला’ असं होतं.
मालिका संपल्यापासून वल्लरी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे डान्स व्हिडीओ देखील सध्या विशेष चर्चेत आले आहेत. अशातच सध्या वल्लरीच्या एका खास व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने “लाइफ इन अ मेट्रो” असं कॅप्शन दिलं आहे. कारण, वल्लरीने पहिल्यांदाच मेट्रो प्रवास केला आहे.
मेट्रोमधून प्रवास करतानाचा खास व्हिडीओ वल्लरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री रितसर तिकीट काढून सामान्य नागरिकांप्रमाणे मेट्रो प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
वल्लरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “दादर मेट्रो स्टेशन आहे का हे…तू प्लीज असे ट्रॅव्हल Vlog आता शेअर करत जा”, “वल्लरी ताई अशीच आनंदी राहा”, “तुला आम्ही मिस करतोय वल्लरी… पण, तू कायम आनंदी राहा”, “मेट्रोमधून कुठे चाललीस वल्लरी ताई सुंदर व्हिडीओ केलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, वल्लरी विराजची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा २५ मे २०२५ रोजी शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. यामध्ये वल्लरीसह राकेश बापट, शर्मिला शिंदे, भूमिजा पाटील, सानिका काशीकर, भारती पाटील या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.