Navri Mile Hitlerla Fame Marathi Actress Dance : देशात आज मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज, विविध सरकारी कार्यलयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट, विविध व्हिडीओ शेअर करत भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी देखील खास नृत्य सादर करून स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना अभिवादन केलं आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने २५ मे २०२५ रोजी सर्वांचा निरोप घेतला. यामधील लीला, अभिराम, दुर्गा, सरोजिनी, किशोर ही सगळी पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री वल्लरी विराज ( लीला ) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडीओ सर्वत्र विशेष लोकप्रिय ठरतात. अभिनेत्रीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आलिया भट्टच्या ‘राझी’ सिनेमातील “ऐ वतन” गाण्यावर सुंदर सादरीकरण केली आहे. हे नृत्य सादर करताना तिला आलापिनी निसळ या अभिनेत्रीने साथ दिली.

आलिया भट्टचा ‘राझी’ सिनेमा २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अभिनेत्रीने भारतीय गुप्तहेर महिलेची भूमिका साकारली होती. हा सिनेमा हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित होता. या सिनेमात ‘ऐ वतन’ हे देशभक्तीपर गीत आहे. अरिजीत सिंह आणि सुनिधी चौहान यांनी हे गाणं गायलं असून आलियाने यावर सुंदर अभिनय केला आहे. याच लोकप्रिय गाण्यावर आता वल्लरी विराज आणि आलापिनी यांनी सादरीकरण केल्याचं पाहायला मिळत आहे.

वल्लरी आणि आलापिनी यांच्या नृत्य सादरीकरणावर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर जवळपास वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. ‘झी मराठी’ वाहिनीवर १८ मार्च २०२४ रोजी, अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. याशिवाय ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला बहुतांश पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं.