‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लोकांची आवडती मालिका आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियावर नाराजीदेखील व्यक्त करताना दिसत आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका संपवू नका असा सोशल मीडियावर ट्रेंडदेखील पाहायला मिळत होता. मालिकेतील सर्वच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांची लाडकी आहेत. सध्या मालिकेत एजे व लीलाच्या आयुष्यात नवीन संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. एजेची पहिली पत्नी अंतरा त्यांच्या आयुष्यात परतली आहे.

एका अपघातात एजेच्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच अंतराचा मृत्यू झाला, असा सर्वांचा समज होता. त्यानंतर एजेच्या आईने त्याचे दुसरे लग्न लावले. लीला त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या रुपात त्याच्या आयुष्यात आली. सुरुवातीला त्या दोघांमध्ये मोठे गैरसमज होते. त्यांचे स्वभावदेखील परस्पर विरुद्ध असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातही पडले.

काही दिवसांपूर्वीच अंतरा एका आश्रमात राहात असल्याचे आजीला समजले. अंतराला पाहून आजींना धक्का बसला. पण, एजे व लीला यांच्या संसारात कोणतेही संकट येऊ नये, यासाठी त्यांनी अंतराला घरी न नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजी काहीतरी लपवत असल्याचा संशय लीला व एजेला आला. त्यानंतर लीलाने आजीचा पाठलाग केला. त्यावेळी तिला अंतरा जिवंत असल्याचे समजले. पण, अंतराला अपघातामुळे तिच्या भूतकाळातील काहीही आठवत नाही. त्यानंतर लीलाने अंतराला घरी आणण्याचा निर्णय घेतला. अंतराला पाहून एजे तसेच घरातील इतरांना धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री काय म्हणाली?

आता या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदेने नुकताच आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतले. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अभिनेत्रीने उत्तरे दिली आहेत. एका चाहत्याने म्हटले की, तुम्ही लीलाला माफ करा आणि अंतराला सीनमधून काढून टाका. यावर उत्तर देताना शर्मिलाने लिहिले, “त्या गरीब अंतराच्या जागी स्वत:ला ठेऊन बघा. तिचे कुटुंब नाही, तिची स्मरणशक्ती गेली आहे. वर्षानुवर्षे ती आश्रमात राहिली आहे. ज्या नवऱ्यावर ती खूप प्रेम करायची, त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे. तिच्यासाठी एवढा तिरस्कार का? माणसासारखा विचार करा”, अशा शब्दात उत्तर दिले आहे.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.