Navri Mile Hitlerla Upcoming Twist: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एजे व लीला यांची जोडी सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. या मालिकेत सध्या नवनीवन ट्विस्ट आले आहेत. आता मालिकेचा नवीन प्रोमो लक्ष वेधून घेत आहे.

अंतराची स्मृती परतली?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला‘ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एजे ऊर्फ अभिराम व अंतरा यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. अंतरा एजेला म्हणते, “अभिराम, तुझ्यावर फक्त माझा नि माझाच हक्क आहे.” तितक्यात लीला खोलीत येते आणि अभिरामला म्हणते, “एजे, अंतराताई बरोबर बोलत आहेत. तुम्ही त्यांचेच आहात.”

लीलाचे बोलणे ऐकूण एजेला धक्का बसतो. तो लीलाला म्हणतो, “लीला, तू हे काय बोलतेस हे तुला कळतंय का?”, असे म्हणत तो लीलाकडे जात असतो. तितक्यात अंतरा त्याला थांबवते. ती त्याला म्हणते, “तुझी व लीलाची साथ इथपर्यंतच होती. आता मला माझ्या वाटेचं प्रेम मिळायला हवं”. त्यावर एजे म्हणतो, “अंतरा हे शक्य नाहीये”, अंतरा त्याला प्रतिप्रश्न विचारते, “हे का शक्य नाहीये?”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अंतरा लीलाला हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. लीला एजेशी बोलण्याचा प्रयत्न करते; पण तितक्यात अंतरा तिला कानाखाली देते. त्यावर एजे मोठ्याने अंतरा, असे म्हणतो. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अंतरा लीलावर हात उचलणार?’ अशी कॅप्शन दिली आहे.

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “लीलाचं स्वप्न असेल”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “बिचारी लीला”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “नक्की हे कोणाचं ना कोणाचं तरी स्वप्न आहे”. एका नेटकऱ्याने लिहिले, “स्वप्न असेल, असे वाटते”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे नक्की लीलाचं स्वप्न आहे”. अनेक नेटकऱ्यांनी हे स्वप्न असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अंतरा ही एजेची पहिली पत्नी आहे. एका अपघातात तिचे निधन झाल्याचे जहागीरदार कुटुंबाला समजले. त्यानंतर अभिराम नीरस पद्धतीने आयुष्य जगत होता. त्याची ती अवस्था पाहून त्याच्या आईने त्याचे दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीच्या रूपात लीला अभिरामच्या आयुष्यात आली. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अचानक अंतरा पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतली आहे. मात्र, तिला तिचा भूतकाळ आठवत नाही. ती एका आश्रमात राहत होती. तिची ती अवस्था पाहून लीलाने अंतराला घरी आणले. तिची ती काळजी घेते. तिची स्मृती परत यावी, यासाठी ती प्रयत्न करते. तिच्या सुना तिला त्रास देतात.

आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये लीला प्रेग्नंट असल्याचे समजले. मात्र, जर तिच्या बाळाबद्दल समजले, तर एजे व अंतरा पुन्हा कधीही एकत्र येणार नाहीत. एजे अंतराला स्वीकारणार नाही आणि याचा दोष तिच्या बाळाला देण्यात येईल, असा विचार करून ही गोड बातमी कोणालाही न सांगण्याचा निर्णय लीलाने मनोमन घेतला आहे. आता अंतराची स्मृती खरंच परत आली आहे का? की हे स्वप्न आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.