Nilesh Sabale On Sharad Upadhye : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची धुरा गेली १० वर्षे डॉ. निलेश साबळेने सांभाळली होती. मात्र, याच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली होती. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात…

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक, निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली होती असं शरद उपाध्येंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. ही पोस्ट सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती आणि यावर डॉ. निलेश साबळे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या प्रकरणावर स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी डॉ. निलेश साबळेने सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून मला बाहेर काढलेलं नाही, इतर कामं असल्याने या सीझनमध्ये मी नसेन, सध्या या सीझनमधून मी माघार घेतलीये असं डॉ. निलेश साबळेने त्याच्या व्हिडीओमधून स्पष्ट केलं आहे. याशिवाय शरद उपाध्येंनी केलेल्या आरोपांवर निलेश साबळे काय म्हणालाय? सविस्तर जाणून घेऊयात…

डॉ. निलेश साबळे शरद उपाध्येंच्या आरोपांवर काय म्हणाला?

नमस्कार मी डॉ. निलेश साबळे, राशीचक्रकार शरद उपाध्ये सर… खरंतर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे आहे. पण, त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करूनच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो, तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आलीये. मला नेहमी वाटायचं या माध्यमावर फक्त मनोरंजनाचे व्हिडीओ शेअर केले पाहिजे, जेणेकरून आपलं लोकांना हसवणं हे काम आहे आणि तेवढंच आपण करू पण, कधी असा व्हिडीओ करावा लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण अशा गोष्टी कराव्या लागतात….

सन्माननीय शरद उपाध्ये सर, तुमची आणि माझी १-२ वेळा भेट झाली होती. तुम्ही माझ्यासाठी कायम गुरुतुल्य आहात. तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं की, निलेश साबळेला ‘झी मराठी’ने डच्चू दिला… हे अशाप्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे. मला एवढंच बोलायचंय सर, तुम्हाला यातील पूर्ण माहिती आहे का? खरंतर, तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती. कारण, सर तुम्हाला सगळेजण ‘गुरू’ म्हणून फॉलो करतात. खरंतर ‘झी मराठी’मध्ये तुमचीही ओळख आहे तुम्ही एक फोन करून विचारू शकला असता की नेमकं काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये?

मी माहितीसाठी सांगतो, ‘झी मराठी’च्या अधिकृत पदावर जी व्यक्ती हेड म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी मला अनेकदा फोन केले. ‘चला हवा येऊ द्या’ सुरू करतोय…डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही. आपण एकदा मिटींग करूयात. त्यानंतर महिन्याभरापूर्वी माझी ‘झी मराठी’बरोबर सविस्तर मिटींग झालीये. त्यांच्या वरळीच्या ऑफिसला आमचं सगळं बोलणं झालं होतं. माझ्या काही अडचणी होत्या, मी सध्या एक सिनेमा करतोय त्यात अडकलोय…त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणारे…त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत. याशिवाय यामागे अनेक विविध कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतो अशी विनंती मी त्यांना केली होती. याचा अर्थ असा होत नाही की, मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला. मी स्वत:हून कार्यक्रमातून माघार घेतलीये कारण, सध्या इतर कामं आहेत. हेच कारण भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे… ते माझ्याच सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील. आम्ही कार्यक्रमात नसण्याचं हे एकमेव कारण आहे.

मला असं वाटतं…सर, तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने याबाबत थोडी माहिती घ्यायला हवी होती. तुम्ही पुढे असं लिहिलंय की, सेटवर माझा अपमान केला. तुमचा एपिसोड २०१४ ते २०१५ मध्ये शूट झालेला आहे, तेव्हा हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमाच्या पहिल्या ५० भागांमधला हा एपिसोड आहे.

मला सेटवर बोलावलं, मला पाणीही विचारलं नाही असंही तुम्ही लिहिलंय. मिरारोड परिसरात हे शूटिंग चालतं…आणि चॅनेलची खूप मोठी टीम यामागे कार्यरत असते. त्यांना सेटवर सगळ्यात मोठी रूम देण्यात आली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक रूममध्ये पाण्याच्या बाटल्या आधीच ठेवलेल्या असतात. कारण, कोणत्या रूममध्ये काय-काय असलं पाहिजे याची आदल्या दिवशी मिटींग झालेली असते आणि या गोष्टी असल्याच पाहिजे अशी वार्निंग देण्यात आलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी विचारलं नाही…ही खरंच माझी जबाबदारी असेल का? हा प्रश्न मला अजूनही पडलेला आहे. कारण, मी तेव्हा रिहर्सल करत होतो.

स्टेजवर जाताना स्माइलही दिलं नाही आणि ४ वाजता आपली भेट झाली असं तुम्हीच लिहिलेलं आहे. माझ्यापेक्षा जे कलाकार मोठे असतात त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून मी त्यांना मेकअप रुममध्ये भेटायला जातो. अनेक मोठमोठी मंडळी आली, त्यांच्या सगळ्यांच्या रूममध्ये मी पाया पडूनच आत गेलोय. तसंच तुमच्याही बाबतीत मी केलंय…याला साक्षीदार वैयजंती आपटे मॅडम आहेत. तुम्ही मला आशीर्वाद दिले, माझं कौतुकही केलंत. हे सगळं बोलणं झाल्यावर मी स्टेजवर जाताना कोणती स्माइल देणं अपेक्षित होतं? आदल्या दिवशी आपलं फोनवर बोलणं देखील झालंय. रामदास पाध्ये सर आणि अशोक हांडे सर त्यांच्या एपिसोडमध्ये आले होते…त्यांच्याशी माझं आधी काहीच बोलणं झालं नव्हतं म्हणून मी ते काय-काय सादरीकरण करणार याची माहिती घेत होतो.

मी माझ्या पद्धतीने प्रत्येकाला वेळ देऊन संवाद साधला आहे. १५ मिनिटांत सगळं उरकण्यात आलं असं तुम्ही लिहिलंय तर, असं होत नाही सर…तुम्ही ‘झी मराठी’शी संवाद साधू शकता की, त्यादिवशी कार्यक्रम किती वेळ रोल ( साधारण २ तास कार्यक्रम रोल होतो ) झाला होता. कारण, कार्यक्रम शूट खूप वेळ होतो आणि प्रेक्षकांना ४५ मिनिटांचा एपिसोड दाखवला जातो.

इतर लोकांना बोलायला दिलं आणि मला बोलू दिलं नाही असं तुम्ही म्हटलं. तुमच्याबरोबर अशोक हांडे सर आणि रामदास पाध्ये सर होते…मी कोणाला जास्त बोला, कमी बोला असं सांगू शकत नाही. आता यामुळे तुमचा काय अपमान झाला मला खरंच समजत नाहीये.

यानंतर आमची भेट ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नात झाली होती. तेव्हा आपण एका टेबलावर बसून २ ते अडीच तास गप्पा मारत होतो. तुम्ही माझ्या भविष्याविषयी बोललात…’चला हवा येऊ दे’ विषयी गप्पा मारल्या, आपण फोटोही काढले. ही भेट २०१७ मध्ये झाली होती मग तेव्हाच तुम्ही २०१४ मध्ये सेटवर घडलेली घटना का सांगितली नाही? आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगायच्या होत्या म्हणून मी सुद्धा हाच मार्ग निवडला.

मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, तुम्ही कायम माझ्यासाठी गुरुतुल्य आहात…आजही तुमच्याबद्दल तोच आदर आहे. मला तुमचं काम फार आवडतं. पण, तुम्ही असं कराल मला खरंच वाटलं नव्हतं. हे एकदा झालं असतं तर मी सोडून दिलं असतं. पण, ही तिसरी वेळ आहे. सहा वर्षांपूर्वी देखील तुम्ही अशीच एक पोस्ट शेअर केली होती. हे सगळे इतर कलाकार चांगले आहेत… पण ते भंगारवाल्याच्या हाती लागले असं वगैरे तुम्ही लिहिलंय. म्हणून आज सोशल मीडियावर येऊन बाजू स्पष्ट करावी लागली. मी प्रत्येकवेळी याकडे दुर्लक्ष केलं पण आता बोलण्याची गरज होती. कारण, डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं…मी पुन्हा एकदा म्हणतोय…फोन करा आणि विचारा.

सर, मला तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही भंगारवाला म्हणाला होता. भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, अध:पतन, खालच्या दर्जाचा हे सगळं तुम्ही ६ वर्षांपूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिलंय…तुम्ही इतकं सगळं बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं. ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करतोय हे मला माहितीये…आमची खूप उत्तम मैत्री आहे, ती कायम राहील. अभिजीत माझ्याहीपेक्षा उत्तम सूत्रसंचालन करतो त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात राहील.

मी तुमच्याविषयी कधीही वाईट पोस्ट केली नाहीये, मी तुमच्या शेजारी राहत नाही, वाईट बोलत नाही, तुम्हाला त्रासही दिलेला नाही….मग तुम्ही हे पुन्हा-पुन्हा का करताय? या घटनेला १० वर्षे झालीत तरी सुद्धा हे का होतंय? हा प्रश्न मला पडलाय. तुम्ही असं लिहिलंय की, माझे सेटवर ६ तास वाया गेले, सर तुम्हाला सांगतो मला तुमच्या पोस्टनंतर काल १००-१५० फोन आले आणि माझेही प्रत्येकाशी बोलण्यात ६ तास वाया गेले… यापेक्षा तुम्ही एक फोन केला असता तर तो वेळही वाचला असता…एवढंच माझं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं, तर यंदा या शोमध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे हे कलाकार झळकणार आहेत. यंदा या कार्यक्रमाचं स्वरुप बदललं असून, विविध ठिकाणी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांच्या ऑडिशन्स सुरू आहेत.