Nilesh Sable’s Upcoming Project: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची २०१४ ला सुरुवात झाली होती. झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या शोमध्ये डॉ. निलेश साबळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला होता.
आता चला हवा येऊ द्याचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मात्र, या शोमध्ये निलेश साबळे नसल्याने मोठ्या चर्चा झाल्या होत्या. आता निलेश साबळे एका वेगळ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
निलेश साबळे ‘या’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
निलेशने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली आहे. या पोस्टरवर निलेशचा फोटो दिसत आहे. तसेच त्यावर वहिनीसाहेब सुपरस्टार असे लिहिले आहे. धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बरंच काही असे लिहिले आहे. वहिनीसाहेब सुपरस्टार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश करणार असून, या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ही पोस्ट शेअर करताना निलेशने “महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो…”, अशी कॅप्शन दिली आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्याला त्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या कार्यक्रमाची ते वाट पहात असल्याचे त्यांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे. आता हा कार्यक्रम नेमका काय असणार हे आगामी काळात समजणार आहे.
निलेश साबळे या आधी स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ढिंचॅक दिवाळी २०२५’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात त्याच्यासह भाऊ कदम, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार हे कलाकारदेखील दिसले होते. या कलाकारांनी स्टार प्रवाहच्या कलाकारांना आणि प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.
निलेशने अभिनय आणि सूत्रसंचालन याबरोबरच, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनदेखील काम केले आहे. चला हवा येऊ द्या बरोबरच निलेश साबळे ‘कॉमेडी आणि बरंच काही’, ‘हसताय ना हसायलाचं पाहिजे’, ‘नवरा माझा भवरा’ या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दरम्यान, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाविषयी बोलायचे तर या कार्यक्रमाचे दुसरे पर्व २०२५ मध्ये सुरू झाले आहे. या कार्यक्रमात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव हे कलाकार दिसत आहेत. तसेच, अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या पर्वालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
