Ashok Saraf & Nivedita Saraf : अनेक दशकांपासून प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादूई नातं मोठ्या पडद्यावर अनुभवलं आहे. आता ही आवडती जोडी लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे. त्यांच्या हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यंत, या जोडीनं कायमच प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.
आता अशोक व निवेदिता सराफ यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत. ही मालिका कलर्स मराठीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ‘निवेदिता’ ही भूमिका साकारणार आहेत. त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहेत. त्या स्वतःचा ‘संस्कार वर्ग’ चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नाही; तो आहे दया, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून जीवनमूल्यं शिकवतात. जेव्हा अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना इरा आणि इशानला या वर्गात आणतात, तेव्हा त्यांना अपेक्षा असते एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची. पण समोर येते एक वेगळीच स्त्री आधुनिक विचारांची…. तिची मोकळी अन् शिकवण्याची हटके पद्धत मामांना सुरुवातीला फारशी आवडत नाही. आता हळूहळू दोघांमधील नातं कोणतं वळण घेणार? हे प्रेक्षकांना मालिकेत कळेल.
निवेदिता सराफ याबद्दल म्हणाल्या, “मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला, माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूप काही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी संधी मिळाली आहे. आता लवकरच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत माझी एन्ट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल.”
