Maharashtrachi Hasyajatra Promo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम गेली ७ ते ८ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत पोहोचले. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने या कलाकारांची, त्यांनी हास्यजत्रेत साकारलेल्या पात्रांची, स्किटची सर्वत्र एक वेगळी क्रेझ निर्माण झाली. लॉकडाऊनमध्येही घरोघरी हास्यजत्रा पाहिलं जायचं.
मात्र, २०२२ च्या अखेरीस ओंकार भोजनेने अचानक या शोमधून माघार घेतली होती. सिनेमाचं शूटिंग आणि प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं त्याने मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. पण, ओंकार भोजनेच्या एक्झिटनंतर हास्यजत्रेच्या चाहत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर उमटला होता. सगळेच त्याला शोमध्ये मिस करत होते. हास्यजत्रेत काम करणाऱ्या कलाकारांच्या पोस्टवरील देखील यासंदर्भातील कमेंट्स येत होत्या.
अखेर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हास्यजत्रेच्या रंगमंचावर ओंकार भोजने पुन्हा एकदा झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीने ओंकारच्या एन्ट्रीचा पहिला प्रोमो अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळी म्हणते, “ज्याला तुम्ही मिस करत होतात… तो पुन्हा येतोय! आता त्याचा आवाज पुन्हा रंगणार…मामांचा मामा, कोकणाचा सन्मान आणि विनोदाची शान ओंकार भोजने परत येणार…..आणि विनोदाचा बोनस डबल होणार”
ओंकारला हास्यजत्रेच्या मंचावर पुन्हा एकदा पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “बरं झालं बाबा ओंकार परत येतोय”, “वेलकमबॅक स्टार”, “क्या बात है… आता गौरव-विशाखा पण पुन्हा आले पाहिजेत”, “भोजने आला…आता खरी मजा येणार”, “पुन्हा स्वागत आहे तुझं”, “ओंकार भोजने तुझ्यासाठी आता परत हास्यजत्रा बघणार”, “ओंकारचं कमबॅक होतंय म्हणजे डिशचा रिचार्ज मारावा लागेल” अशा भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
दरम्यान, ओंकार भोजनेसाठी हास्यजत्रेच्या अन्य कलाकारांनी देखील खास पोस्ट शेअर करत त्याचं सेटवर पुन्हा एकदा स्वागत केलं आहे. आता भोजनेच्या एन्ट्रीनंतर हास्यजत्रेच्या आगामी भागात काय नवीन पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षक सोनी मराठीवर पाहू शकतात.