Onkar Bhojane Re-Enters In Maharashtrachi Hasyajatra : विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखलं जातं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. मात्र, मध्यंतरी सिनेमाचं शूटिंग आणि प्रकृतीच्या कारणास्तव ओंकारने या शोमधून ब्रेक घेतला होता.

ओंकार भोजनेने हास्यजत्रेतून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. प्रत्येकजण त्याला शोमध्ये मिस करत होता. हास्यजत्रेत सहभागी होणारे पाहुणे सुद्धा ओंकार पुन्हा केव्हा येणार याबद्दल विचारणा करत होते. सोशल मीडियावर चाहते देखील ओंकारला पुन्हा एकदा हास्यजत्रेत सहभागी हो अशी विनंती करत होते. अखेर सर्वांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या मंचावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

ओंकारच्या रिएन्ट्रीमुळे कार्यक्रमाची रंगत आता पुन्हा एकदा वाढणार अशा चर्चा सर्वत्र रंगत आहेत. अभिनेत्याच्या घरवापसीमुळे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. ओंकारचे गाजलेले स्किट, त्याचा ‘साइन, कॉस, थिटा’ हा डायलॉग या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा एकदा शोमध्ये अनुभवता येणार आहेत.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने महाराष्ट्र टाइम्सचं आर्टिकल शेअर करत ओंकार पुन्हा एकदा हास्यजत्रेत सहभागी होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पोस्टला “हॅलो हॅलो…” असं कॅप्शन देत प्रियदर्शिनीने ओंकार भोजनेचं शोमध्ये स्वागत केलं आहे.

ओंकार भोजनेने हास्यजत्रेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून, दिवाळीमध्ये त्याच्या एन्ट्रीचा विशेष भाग प्रसारित करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आता प्रेक्षक सुद्धा त्याचं स्किट पुन्हा एकदा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

दरम्यान, २०२२ च्या अखेरीस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर ओंकार भोजने ‘सरला एक कोटी’ या सिनेमात झळकला होता. मध्यंतरी तो ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये देखील सहभागी झाला होता. आता ३ वर्षांनी अभिनेत्याची पुन्हा एकदा घरवापसी झालेली आहे.