Paaru fame Shrutkirti Sawant On Nirmiti Sawant: निर्मिती सावंत यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. अनेक कलाकारही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत.

निर्मिती सावंत यांची ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास‘ या मालिकांच्या महासंगममध्ये एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. पद्मावती हे पात्र त्यांनी साकारले होते. लक्ष्मी, अहिल्या व पद्मावती या जुन्या वर्गमैत्रीणी होत्या. मात्र, कॉलेजमध्ये शिकत असताना पद्मावतती आणि लक्ष्मी व अहिल्या यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते. त्याचा राग इतक्या वर्षानंतरही पद्मावरतीच्या मनात होता.

अनेक वर्षांनी भेटल्यानंतर पद्मावतीने लक्ष्मी व अहिल्याला मंगळागौरीच्या स्पर्धेचे चॅलेंज दिले. ते लक्ष्मी व अहिल्या यांनी स्विकारले. त्यानंतर मोठी चढा ओढ पाहायला मिळाली.

श्रुतकिर्ती सावंत काय म्हणाली?

आता अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंतने निर्मिती सावंत यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीने नुकताच ‘मराठी मनोरंजन विश्व’शी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप कमाल आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करताना त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळते. मजा येते. मी निर्मिती ताईंना जितकं पाहिलं, त्यांचं निरिक्षण केलं, त्यावरुन जाणवलं की त्या खूप शांत आहेत.

“त्या त्यांची वाक्य शांतपणे वाचतात. एका सीनचे शूटिंग संपले की त्या एका कोपऱ्यात जाऊन बसतात. तिथे त्या पुढच्या सीनसाठी तयारी करतात. परत, पुढच्या सीनसाठी छान ऊर्जेने येऊन उभ्या राहतात. तर मी त्यांच्याकडून हे शिकले की आता थांबायचं नाही, काम करत राहायचं”, अशा भावना व्यक्त केल्या.

श्रुतकिर्ती सावंतने पारू मालिकेत दामिनी ही भूमिका साकारली आहे. स्वत:ला मान सन्मान मिळावा यासाठी सतत धडपड करत असणारी, अनेकदा त्यासाठी कट कारस्थाने करणारी, तसेच तिच्या डायलॉगने प्रेक्षकांना हसवणारी अशी ही दामिनी आहे. पारूला त्रास देण्यासाठी ती वेळोवेळी दिशाला मदत करत असल्याचे दिसते. अनेकदा ती अहिल्याची बोलणीदेखील खाते.

पारू मालिकेत पारू आणि आदित्यने लग्न केल्याचे श्रीकांतला समजले आहे. ही गोष्ट अहिल्याला मात्र माहित नाही. जेव्हा श्रीकांतला जेव्हा आदित्य व पारूच्या लग्नाबाबत समजले. तेव्हा त्याला धक्का बसला होता. अहिल्याला ही गोष्ट न सांगितल्याबद्दल त्याच्या मनात पारू आणि आदित्यविषयी राग होता.

आता अहिल्यादेवी किर्लोस्करला पारू व आदित्यच्या लग्नाचे सत्य कधी समजणार, ती हे लग्न स्विकारणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.