Paaru Zee Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत सध्या मोनिकामुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. मोनिका लवकरच आई होणार आहे. तसेच तिच्या पोटातील मूल हे प्रीतमचं आहे असा दावा तिने केला आहे. सुरुवातीला तिच्यावर किर्लोस्कर कुटुंबीय अजिबात विश्वास ठेवत नाहीत… मात्र, मोनिका आता डीएनए टेस्ट करायला सुद्धा तयार झाली आहे.
जर DNA टेस्टमध्ये मोनिकाच्या पोटातील बाळ प्रीतमचं आहे हे सिद्ध झालं तर, प्रीतमने त्याची पत्नी प्रियाला घटस्फोट द्यावा अशी अट मोनिकाने ठेवलेली असते.
प्रीतम या सगळ्या गोष्टी ऐकून प्रचंड घाबरतो. तो ‘पारू’समोर आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स जर आपल्या विरोधात आले… तर पुढे काय करायचं असा विचार प्रीतमच्या डोक्यात सुरू असतो. एकीकडे किर्लोस्करांच्या घरात या सगळ्या घडामोडी घडत असताना, दुसरीकडे त्यांचे गुरुजी एक मोठा संकेत अहिल्यादेवींना देणार आहेत.
किर्लोस्करांच्या घरावर मोठं संकट येणार असल्याची माहिती गुरुजींनी अहिल्यादेवींना दिली आहे. यानंतर अहिल्यादेवी घरात पूजा करण्याचा निर्णय घेतात. यादरम्यान, गुरूजी पारूची भेट घेतात आणि तिला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतात. ते म्हणतात, “या घरावरचं संकट जर टाळायचं असेल तर, तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल.”
गुरुजींचं हे बोलणं ऐकून पारूला धक्का बसतो. तर, लेकीच्या जीवाला धोका असल्याचं ऐकताच मारूतीला अश्रू अनावर होतात. यावर गुरूजी मारूतीला सांगतात, “हे सर्व आपण टाळू शकत नाही…त्यामुळे माझ्याशी वाद घालून काहीच उपयोग होणार नाही.”
आता किर्लोस्करांवर नेमकं कोणतं संकट येणार? आणि या सगळ्यातून पारू कसा मार्ग काढणार? याचा उलगडा ‘पारू’ मालिकेच्या आगामी भागात होणार आहे.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये शरयू सोनावणे व प्रसाद जवादे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.